लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेत ज्याची चूक असेल, मग तो भाजपचा नेता असो किंवा कोणी असो, त्याची चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे. अशा घटना भाजपला अपेक्षित नसून पक्ष पात‌ळीवर याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरण गंभीर असून या पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रात होऊ नये. जर गणपत गायकवाड यांची चूक असेल तर प्रशासन तसा निर्णय घेईल. दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. समाजात दहशत निर्माण होईल असे वातावरण तयार होऊ नये आणि राज्याच्या प्रतिमेला हानी पोहचेल असे वागू नये. पक्ष पातळीवर आमदार गायकवाड यांची माहिती घेतली जाईल असेही बावनकुळे म्हणाले.

आणखी वाचा-दारुसाठी पैसै न दिल्याने मित्राचा खून, नव्या आयुक्तांसमोर आव्हान

अशा प्रकरणात विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी करणे हे त्यांचे काम आहे. पण चौकशी झाली पाहिजे. गणपत गायकवाड म्हणतात की जीवाच्या रक्षणासाठी मी हे पाऊल उचलला आहे. त्यामुळे चूक कोणाची याची चौकशी पोलीस करत आहे. मात्र अशा घटनांमुळे वाईट संदेश जातो. घटना गंभीर असून त्यात जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई व्हावी असेही बावनकुळे म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या घटनेबाबत मुख्यमंत्र्याशी बोलले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी असेही बावनकुळे म्हणाले.

या घटनेमुळे भाजप अडचणीत येण्यापेक्षा समाजाला काय वाटते ते आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. समाजमनाची चिंता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीची चिंता आहे. लोकप्रतिनिधी हातून असे काही होणे हे भाजपला अपेक्षित नाही. अशा घटनांतून पक्षाची बदनामी होते. सरकार आणि गृहखाते हे तपासेल आणि अशी घटना घडू नये यासाठी प्रयत्न करेल असेही बावनकुळे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State president of bjp chandrasekhar bawankule reaction on kalyan firing case vmb 67 mrj
Show comments