scorecardresearch

“काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजत असाल तर…”, नाना पटोले यांचे नाव घेत सुनील केदार यांचे सूचक विधान

बाळासाहेब थोरात – नाना पटोले यांच्या वादावर सुनील केदार यांनी मोठे विधान केले असून १५ तारखेच्या काँग्रेसच्या बैठकीत हा कलह मिटवू असेही ते म्हणाले.

sunil kedar on balasaheb thorat and nana patole
सुनील केदार यांचे सूचक विधान

विधानपरिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेस पक्षात सुरु झालेला कलह हा पक्षातंर्गत चर्चा करुनच मिटला पाहीजे, अशी आग्रही भूमिका सुनील केदार यांनी मांडली. १५ तारखेला काँग्रेस पक्षाची बैठक होत आहे, त्या बैठकीत मी माझी भूमिका मांडेन, असे सुतोवाच केदार यांनी केले. तसेच कुणीही काँग्रेस पक्षाला स्वतःच्या घरचा पक्ष समजू नये, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा आधार घेत सुनील केदार म्हणाले की, नाना पटोले यांनी जे सांगितले ते पक्षातील सर्वच नेत्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना लागू होत आहे. ही गोष्ट नाना पटोले यांनीच बोलून दाखवली ते बरं झालं, असंही ते म्हणाले.

“बाळासाहेब थोरात यांच्यासोबत राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत, बाळासाहेब थोरात गेल्या अनेक वर्षांपासून पक्षात आहेत. त्यांच्या वडीलांपासून ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस पक्षाच्या अनेक दशकांपासून राजकीय घडामोडींचे ते साक्षीदार आहे. अनेक लोकं इतर पक्षात गेले. मात्र बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्येच राहिले आहेत. मात्र जो विषय पुढे येत आहे. ते पक्षाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. पक्ष कुठेतरी मागे जात आहे, पक्षातील कलह पक्षातच सुटला पाहिजे.”, अशी भावना सुनील केदार यांनी मांडली.

हे वाचा >> अजित पवारांनी एका वाक्यात वरळीच्या सभेची उडवली खिल्ली, म्हणाले, “वरळीमध्ये जंगी, भव्य…”

थोरात आणि पटोले यांच्या निर्माण झालेल्या वादावर बोलताना केदार म्हणाले की, “कुणी कुठल्याही पदावर पोहोचले म्हणजे आकाशाला हात लावला असे होत नाही. शेवटी काँग्रेसची एक विचारधारा आहे. थोरात यांनी काँग्रेससाठी जे योगदान दिले, ते नाकारता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना सांभाळणे आमचे सर्वांचे कौतुक आहे. तसेच कुणी हा पक्ष घरचा समजत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं जर नाना पटोले बोलले असतील तर हा नियम सर्वांनाच आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यांना लागू होईल. केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी हा प्रश्न निकाली काढतील, मात्र केंद्रातील नेत्यांची गरज भरायला नको, राज्यातील पिढ्यान पिढ्या निष्ठा ठेवणारे नेते हा प्रश्न निकाली काढतील, असा मला विश्वास आहे. आमच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आम्ही सोडवू.”

२०१९ मध्ये प्रदेशाध्यक्ष असताना थोरात साहेबांनी आघाडीमध्ये चांगली माध्यस्थि केली, पक्ष मजबूत केला. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा सन्मान झालाच पाहिजे, तुम्ही कितीही आकाशाला पोहचला तरी, तुम्ही कितीही मोठे झाले असे समजत असाल तरी बाळासाहेब थोरात यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना आम्ही सांभाळू. बाळासाहेब थोरात यांच्याशी न बोलता भूमिका मांडणे घातक आहे. विरोधक काँग्रेस पक्षाला संपवायला लागले होते, सुरुंग लावणार होते, मात्र पक्ष संपला नाही, संपणार नाही.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 19:05 IST
ताज्या बातम्या