लोकसत्ता टीम

अकोला : वाढत्या शहरीकरणामुळे चिऊताईचा चिवचिवाट आता दुर्लभ होत चालला आहे. शहरातील १५ टक्के घरांमध्ये चिमण्यांचे दर्शन देखील होत नसल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

शहरी भागासह गावांमध्ये वाढलेले काँक्रिटीकरण, स्थानिक वृक्षांची कमतरता आदी कारणामुळे चिमण्यांची संख्या घटत आहे. या समस्यांकडे सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्यासाठी निसर्गकट्टा, महाराष्ट्र पक्षीमित्र, वन विभाग अकोला व शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन चिमणी गणना करण्यात आली. यामध्ये ३८० लोकांनी सहभाग घेतला. सुमारे १५ टक्के घरांमधून चिमण्या दिसतच नसल्याचे समोर आले.

आणखी वाचा- “स्वबळाची भाषा करायची अन् आपली जागा पदरात पाडून…” तुपकरांचे राजू शेट्टींवर टीकास्त्र

३८ टक्के घरांमध्ये वर्षभर जास्त चिमण्या दिसतात. ८६ टक्के लोकांनी चिमण्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवले, ८० टक्के लोक चिमण्यांसाठी धान्य ठेवतात. ४८ टक्के घरांमध्ये कृत्रिम घरट्यांचा निवारा केला, तर ६७ टक्के मोबाइल टॉवरच्या परिसरात चिमण्यांचे अस्तित्व आढळून आले. भरपूर वृक्ष असलेल्या ५९.८ टक्के भागात चिमण्या जास्त आढळून आल्या आहेत. चिमण्यांना धूळ आंघोळीसाठी केवळ ९.९ टक्के अंगणात माती आहे. सन २०२२ पासून ऑनलाइन सर्व्हे केला जात असून चिमण्यांबाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश असल्याचे अमोल सावंत यांनी सांगितले. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांमध्ये पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.

अल्प प्रतिसाद

गत वर्षीच्या तुलनेत यंदा सर्व्हेला अल्प प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यासह निसर्गात होणाऱ्या बदलांची नोंद करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र पक्षीमित्रचे जिल्हा समन्वयक डॉ. मिलिंद शिरभाते यांनी नोंदवले.