यवतमाळ : शहरात गेल्या काही दिवसांपासून घरासमोर उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडत आहे. गेल्या १५ दिवसांपासून या टोळीची शहरात पसरली असून, एका घटनेत ही टोळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होवूनही अद्याप आरोपींपर्यंत पोलीस पोहोचू शकले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शहरातील अंबिका नगर, सुराणा ले आउट, कपिलवस्तू नगरात गेल्या १५ दिवसांपासून १० जणांच्या टोळक्याने हैदोस घातला आहे. घराच्या आवारातील दुचाकी, कार जाळल्याची घटना आठ दिवसांपूर्वी परिसरात घडली होती. आता पुन्हा एकाच दिवशी मालवाहू ॲपे, कारसह चार वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. वाहन फोडणारी टोळी सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : ‘राजा कायम’, पीकपाणी साधारण! भेंडवळच्या घटमांडणीचे निष्कर्ष

अनिकेत लोहकरे याचे मालवाहू वाहन (क्र. एमएच २९ बीई ६७७१) घरापुढे उभे होते. पहाटे दोन दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी वाहनाच्या काचांची तोडफोड केली. तसेच दीपक पुरुषोत्तम कदम यांचे वाहन (क्र. एमएच ३१ व्हीव्ही १६९०), नीलेश महाजन (रा. अंबिकानगर) यांचे वाहन (क्र. एमएच १२ केएन ३८०२), शेख सलमान इकबाल (रा. सुराणा ले-आऊट) यांचे वाहन (क्र. एमएच २९ एएन ११७२) यांची तोडफोड केली. वाहन फोडण्याच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे होताच त्या ठिकाणावरुन टोळक्याने अश्लील शिवीगाळ करत पळ काढला. हा सर्व प्रकार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यावरून शहर पोलिसांनी जित्या मेश्राम (२१, रा. चमेडियानगर), अविनाश दिलीप पवार (२२), उमेश शेख (रा. चमेडियानगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – एसटी महामंडळात गर्दीचा हंगाम पाहून कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई? झाले असे की…

या घटनेच्या आठ दिवसांपूर्वी शहरातील अंबिका नगरातील प्रकाश नरगडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली होती. आता पुन्हा या परिसरात एकाच दिवशी चार वाहने फोडून या टोळीने दहशत पसरविली. आरोपी सीसीटीव्हीत कैद होवूनही पोलिसांनी अद्याप त्यांना ताब्यात न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.