नागपूर: उपराजधानीतील चोरटे कोणती वस्तू चोरून नेतील याचा नेम नाही. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) शल्यक्रिया गृहातील वातानुकुलीत यंत्रातील (एसी) काॅईलच चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनाच धक्का बसला.

आशियातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) म्हणून नागपुरातील मेडिकल रुग्णालयाची ख्याती आहे. येथे चांगली रुग्णसेवा देण्यासाठी शासनाने अनेक अद्यावत शल्यक्रिया गृह उपलब्ध केले आहे. शनिवारपासून येथील शल्यक्रिया विभागाच्या अखत्यारित असलेल्या एका शल्यक्रिया गृहातील एक मध्यवर्ती वातानुकुलीत यंत्र काम करत नव्हते. प्रशासनाकडून दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्यूत विभागाकडे तक्रार दिली गेली.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”

सदर विभागाकडून पाहणी केल्यावर वातानुकुलीत यंत्रातून चोरट्यांनी चक्क काॅईलच पळवल्याचे पुढे आले. ही माहिती मेडिकल रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनाही धक्काच बसला. या वातानुकुलीत यंत्राच्या सोभोवताल लोखंडी जाळी होती. त्यानंतरही ही काॅईल चोरण्यात आली. दरम्यान शल्यक्रिया गृहासारख्या भागातील वातानुकुलीत यंत्रातील काॅईल चोरी गेल्यावर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी सोमवारी एक बैठक घेतली. यावेळी मेडिकल परिसरातील वातानुकुलीत यंत्रासह इतर चोरींसाठी येथील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मराहाष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची कानउघाडणी केली गेली. दुसरीकडे तातडीने येथील शल्यक्रियासह इतर रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये म्हणून वातानुकुलीत यंत्र दुरूस्तीचीही सूचना केली गेली. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

हेही वाचा – शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे होणार विदर्भातील खेळाडूंना फायदा

डॉक्टरांसह नागरिकांच्याही वाहनांची चोरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्थायी- अस्थायी कर्मचारी- अधिकाऱ्यांसह रुग्ण व त्यांचे नातेवाईक, विविध औषध कंपन्यांचे वितरक, कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी अशा रोज सुमारे २० ते २५ हजार नागरिकांची रेलचेल असते. त्यापैकी अनेक जन वाहनांनी येतात. गेल्या काही दिवसांमध्ये येथे डॉक्टरांसह कर्मचारी व काही नागरिकांचे वाहन चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहे. नुकतेच काही डॉक्टरांकडून वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात त्याबाबत तक्रार दिल्यावर पोलिसांकडेही तक्रार दिली गेली होती. परंतु त्यानंतरही चोरी वाढत असल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.