नागपूर: ‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. नागपूरच्या क्रीडा संकुलाला राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला असून संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी ७४६.९९ कोटींच्या सुधारीत अंदाजपत्रकासही मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर विभागीय क्रीडा संकुलाचे अद्ययावतीकरण व नुतनीकरण करुन विदर्भातील युवकांना खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्ताव क्रीडा विभागाने शासनाला सादर केला. नवीन सुविधेत आता ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, आर्चरी रेंज, हॉकी, फुटबॉल पॅव्हेलियन इत्यादी खेळांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. यातून विदर्भातील खेळाडू, प्रशिक्षकांना क्रीडा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.

हेही वाचा – महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”

नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठी राज्य योजनेतून यापूर्वी रु. ५१. २० कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून क्रीडांगण विकास योजनेस १२ कोटी असा एकूण ६३.२० कोटी इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता नागपूर विभागीय क्रीडा संकुलाच्या अद्ययावतीकरण व नुतनीकरणासाठी रु.६८३.७९ कोटींचे अंदाजपत्रक प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे नागपूर विभागीय क्रीडा संकुलास शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर राज्यस्तरीय क्रीडा संकुलाचा दर्जा देवून संकुलामध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी ७४६.९९ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली, असे बनसोडे म्हणाले.

हेही वाचा – वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

नागपूरचा लौकिक वाढेल – फडणवीस

विदर्भामध्ये पायाभूत सुविधेच्या दृष्टिकोनातून एम्स सारखी आरोग्यासाठी अत्याधुनिक सुविधा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ट्रिपल आयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पाठोपाठ नव्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्वरुपात विकसित होणारे आपले विभागीय क्रीडा संकुल एक मानांकन ठरेल. इथल्या खेळाडूंना चांगले प्रशिक्षक व गुणवत्तापूर्ण क्रीडा सुविधा उपलब्ध होत असल्याने जागतिक पातळीवर क्रीडाक्षेत्रातही नागपूरचा लौकिक वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to this decision of the government the players of vidarbha will benefit cwb 76 ssb
First published on: 27-02-2024 at 15:32 IST