शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विदर्भवाद्यांबद्दल जी भाषा वापरतात तसे संस्कार विदर्भाची माती देत नाही. मात्र, विदर्भाच्या आंदोलनामुळे उद्धव ठाकरे आणि निलेश राणे यांच्यामध्ये घबराट पसरली असल्याची टीका विदर्भाच्या आंदोलनाची धुरा सांभाळणारे अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
महाराष्ट्र दिन हा काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन केल्यानंतर विदर्भवादी संघटनांनी श्रीहरी अणे यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा झेंडा फडकवला. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅड. अणे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना अ‍ॅड. अणे म्हणाले, महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी आम्ही आज काळा दिवस पाळत आहोत आणि शिवसेनेला आंदोलन करावे लागत असेल तर हा आमचा विजय आहे. विदर्भाला आणि श्रीहरी अणे यांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने रस्ता रोको किंवा पुतळा जाळून आंदोलन केले असले तरी ते विदर्भाच्या हिताचे आहे. विदर्भाची मागणी जोर असताना शिवसेना, मनसे अस्वस्थ झाली असून त्यांनी टीका करणारी विधाने केली असतील मात्र, विदर्भाच्या मातीला तसे संस्कार नाहीत, असेही अ‍ॅड. अणे म्हणाले. विदर्भाचे समर्थक आंदोलन करीत असतील व त्याला विरोध करण्यासाठी शिवसेना प्रतिआंदोलन करीत असेल तर तो आमचा विजय आहे. विदर्भाचे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार असून ही आता सुरुवात असल्याचे अ‍ॅड.अणे यांनी सांगितले.

यवतमाळमध्ये बस फोडली
रविवारीे महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच विदर्भात मात्र ठिकठिकाणी विदर्भाचा झेंडा फडकवून आणि आंदोलन करून हा दिवस काळा दिन म्हणून पाळण्यात आला. यवतमाळात एसटीच्या पाच बसेसची तोडतोड करण्यात आली, तर अखंड महाराष्ट्राच्या समर्थकांनी विदर्भवाद्यांच्या निषेधार्थ आंदोलन केले.
महाराष्ट्र दिनानिमित्त कस्तुरचंद पार्कवरील शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झेंडावंदन करीत असताना विदर्भवाद्यांनी काळ्या रंगाचे फुगे आकाशात सोडले. या फुग्यांना जय विदर्भ लिहिलेले पोस्टर्स लागलेले होते.

शिवसेनेचे प्रत्युत्तर
विदर्भासाठी आंदोलन सुरू असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेना, मनसे आणि अखंड महाराष्ट्र समिती आंदोलनात उतरली. शिवसेनेने पारडी चौकात अणे यांच्या पुतळ्याचे दहन करून वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचा निषेध केला. मनसेनेही अणेंविरोधात अखंड महाराष्ट्राचा जयघोष केला.