संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : कुटुंबातील अन् गावातील राष्ट्रप्रेमी महिलेचे निधन झाल्याने शोकाकुल कुटुंबातील सदस्य, सोयरे आणि ग्रामस्थ त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ही अंत्ययात्रा ग्रामपंचायतजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोहोचली तेव्हा तिथे सामूहिक राष्ट्रगीत गायनाची लगबग सुरू होती. अंत्ययात्रा तिथेच थांबवून सर्व जण राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले. कार्यक्रम पार पडल्यावरच शोकाकुल ग्रामस्थ स्मशानभूमीकडे निघाले आणि मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जळगाव-जामोद तालुक्यातील काजेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सुमनताई काशीराम बोरणारे (८४) या स्वातंत्र्यदिन आणि गणतंत्र दिनी झेंडावंदनाला न चुकता हजर राहायचा. त्यादिवशी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांना राष्ट्रप्रेमाच्या कथा त्या ऐकवत होत्या. त्यांचे मंगळवार, १६ ऑगस्टला दीर्घ आजाराने निधन झाले. आज, बुधवारी त्यांच्या निवासस्थानावरून निघालेली अंत्ययात्रा ग्रामपंचायतनजीक सकाळी अकरा वाजता पोहोचली, तेव्हा सरपंचाचे पती सुहास वाघ यांनी राष्ट्रगीत गायनाची वेळ झाली असल्याचे गावकऱ्यांना लक्षात आणून दिले. यावेळी मनोहर पाटील वाघ, डॉ. अशोक शेजोळे, बंडू पाटील, दादाराव धंदर, विनायक खारोडे आणि शोकाकुल पाहुण्यांनी अंत्ययात्रा ग्रामपंचायत समोर थांबवली. राष्ट्रगीत झाल्यावरच सुमन बोरणारे यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली. त्यांच्या पश्चात ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप बोरणारे, इतर तीन मुले व दोन मुली, नातवंडे असा आप्तपरिवार आहे. काजेगाववासीयांच्या या अनोख्या राष्ट्रभक्तीची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.