लोकसत्ता टीम

नागपूर : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली. ती जनहितार्थ असल्याचा उद्देश स्पष्ट केल्याशिवाय उत्तर देणार नसल्याची भूमिका मनोरुग्णालयाने घेतली. त्यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी हा माहिती अधिकाराचा भंग असल्याचे सांगत माहिती आयुक्तांकडे तक्रारीचा निर्णय घेतला आहे.

कोलारकर हे सातत्याने माहिती अधिकारातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागातील माहिती सामाजिक हितासाठी नागरिकांपुढे आणत असतात. त्यांच्या माहितीमुळे शासकीय कार्यालयातील बऱ्याच अनियमितताही बाहेर आल्या आहे. माहिती आयुक्तांकडूनही बऱ्याचदा कोलारकर यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला आहे. कोलारकर यांनी नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडूनही माहिती मागितली. त्यात १ जानेवारी २०२१ पासून मनोरुग्णालयातील वर्षनिहाय बाह्यरुग्ण व आंतरुग्ण विभागातील रुग्णसंख्या, रुग्णशय्येची संख्या, बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, रुग्णांनी किती रुग्ण वा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला याची संख्या, रुग्णालयाला शासनाकडून मिळालेल्या अनुदानासह इतर माहिती मागितली. त्यावर रुग्णालय प्रशासनाने कोलारकर यांना पत्र लिहून ही माहिती जनहितार्थ असल्याचा बोध होत नसल्याचे सांगत उद्देश स्पष्ट करण्यास सांगितले.

आणखी वाचा-राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट

प्रत्यक्षात मनोरुग्णालयाकडून यापूर्वी अनेकदा ही माहिती कोलारकर यांना दिली गेली आहे. त्यानंतर अचानक उद्देश व जनहितार्थचा प्रश्न उपस्थित करत मनोरुग्णालयाने माहिती अधिकार कायद्याचा भंग केल्याचे सांगत कोलारकर आणि इतरही माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची तक्रार माहिती आयुक्तांकडे करण्याचे ठरवले आहे. त्यापूर्वी कोलारकर यांनी मनोरुग्णालयाला पत्र पाठवत त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा भंग केल्याचेही पत्र दिले आहे. पत्रात त्यांनी रुग्णालयाला कायद्याचीही जाणीव करून दिली आहे. या विषयावर मनोरुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.