मालेगाव शहरातील जुने बस स्टॅन्ड परिसरातील मोबाईल दुकान फोडणाऱ्या चार गुन्हेगारांना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी ही माहिती दिली.

फईम अहमद सलीम अहमद (वय २०), मोहम्मद कामील हकीब उल्लाह (वय २२), शाहरुख अहमद जमील अहमद (वय २०), समशेर खान पिरखान (वय १८) (सर्व रा. मालेगाव) या गुन्हेगारांना पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील सुमारे २२ मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले. १ लाख ३८ हजार रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे. दरम्यान, मालेगाव शहर जुने बस स्टॅन्ड परिसरातील मोबाईल दुकानही फोडल्याची कबुली आरोपींनी यावेळी दिली. यामुळे मालेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे आणि मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.