नाशिक: चालू रब्बी हंगामात केंद्र सरकार पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून त्यातील ९८ टक्के कांदा महाराष्ट्रातून आणि त्यातही ९० टक्के एकटय़ा नाशिकमधून खरेदी करणार असल्याची माहिती सरकारी यंत्रणांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निर्यात बंदीची मुदत वाढविल्याने शेतकऱ्यांमधील नाराजी कमी करण्यासाठी कांदा खरेदी योजनेशी संबंधित जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याद्वारे अप्रत्यक्ष सत्ताधारी पक्षाचा प्रचार होत असल्याचा आरोप आहे. 

सरकारच्यावतीने कांदा खरेदी करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ (एनसीसीएफ) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) यांच्यातर्फे शुक्रवारी कांदा उत्पादकांसाठी जनजागृतीवर कार्यक्रम नाशिक येथे झाला. यावेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार आय. एस. नेगी, एनसीसीएफच्या प्रमुख अ‍ॅन्सी जोसेफ चंद्रा आणि नाफेडचे एस. के. सिंग यांनी रब्बी २०२४ मधील कांदा खरेदीच्या तयारीची माहिती दिली. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने शेतकरी व ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत एनसीसीएफ आणि नाफेड प्रत्येकी अडीच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from maharashtra amy
First published on: 13-04-2024 at 06:11 IST