इवल्याशा ३१ हजार गणपती मूर्तीची निर्मिती

एरवी वर्गातील कामचुकार-खोडकर विद्यार्थ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी फळ्यावरचा खडू महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. मात्र गुरुजींच्या हातातील हा खडू ज्या वेळी कलावंताच्या हातात येतो, तेव्हा ‘जे न दिसे रवी, ते दिसे कवी’ या उक्तीनुसार त्या खडूतून असंख्य कलाकृती निर्माण होतात. सिन्नर येथील कलावंत संजय क्षत्रिय यांच्या संकल्पनेतून आजवर अनेक कलाकृती तयार झाल्या. या निवडक कलाकृतीचे प्रदर्शन खास गणेशोत्सवानिमित्त सिन्नर येथे आयोजित करण्यात आले आहे.

‘टाकाऊतून टिकाऊ’ मात्र पर्यावरणपूरक या संकल्पनेवर काम करत असताना क्षत्रिय यांना खडू आणि त्यासाठी वापरली जाणारी पांढरी पावडर यापासून कलाकृती तयार करण्याचा ध्यास घेतला. यासाठी हाती जुजबी कौशल्य असले तरी कलेसाठी आवश्यक नजाकत, कलाकुसर यावी, यासाठी त्यांनी मेहनत घेण्यास सुरुवात केली. रामावर त्यांची विशेष श्रद्धा असल्याने सुरुवातीला खडूचे तुकडे घेऊन ते एकसारखे चिटकवत त्यांनी काहींना तिरपा, काहींना गोल असा आकार देत १३६ खांब कोरत त्या मंदिरावर दोन मजले चढवत सुंदर असे ‘राममंदिर’ तयार केले. १२ इंच व पाया १३ इंच बाय १८ इंच आकारात राममंदिर आकारास आले. मंदिराला सात घुमट आहे. यात एक सर्वात मोठा, दोन त्यापेक्षा लहान व चार सर्वात लहान घुमट अशी त्यांची रचना आहे. मंदिराच्या आजूबाजुला इतरही ११ खडूंची गणपती मंदिरे आहेत. पहिल्याच प्रयत्नात झालेली

ही सुंदर कलाकृती पुढील प्रवासाची नांदी ठरली. नियमित कामकाजातील ४ तास राखीव ठेवत क्षत्रिय त्यासाठी काम करतात.

हा छंद जोपासण्यासाठी त्यांना पत्नी वंदना, मुली पूजा व अक्षदा यांची मदत होते. गेल्या १८ वर्षांपासून क्षत्रिय यांची कला साधना अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे ३१ हजार गणपतीच्या पाव इंचापासून ते तीन इंचापर्यंतच्या मूर्ती तयार झाल्या. त्यात विशेष म्हणजे ८१ गणपतींची नऊ थरांची दहीहंडी, वाद्य वाजविणारे गणपती, ५१ मुशकांचा वाद्यवृंद, कॅसेट कव्हरवर ११०० गणेशमूर्ती कोरल्या. सुपारींवर ११ गणपती, नखावर ११ गणपती, आंब्याच्या कोयीपासून तयार केलेले मुखवटे, ११०० बाटल्यांपासून तयार केलेल गणेश मंदिर, एक लाख गुल काडय़ांपासून तयार केलेले दादरचे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, ११ किलो कापसापासून तयार केलेले दिल्लीचे अक्षरधाम मंदिर, सुवर्ण मण्यांपासून तयार केलेले अमृतसरचे सुवर्ण मंदिर अशा अनेक कलाकृतींच्या प्रतिकृती त्यांच्या संग्रहालयात आहे. मात्र या सर्व कामात शासकीय मदत झालेली नाही ही खंत त्यांना आजही सतावते.

त्यांच्या निवडक कलाकृतींचे प्रदर्शन आजवर नाशिक, नगर, श्रीरामपूर येथे झाले. गणेशोत्सव काळात सिन्नर येथील कमलनगर, सरदवाडी रोड, सिन्नर येथे हे प्रदर्शन दुपारी चार ते रात्री १० या वेळेत सर्वासाठी खुले आहे. कलाप्रेमींनी याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन क्षत्रिय यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१९ १९७४० या क्रमांकावर संपर्क साधावा.