दुहेरी हत्या प्रकरणात रिपाइं नगरसेवकाच्या ग्रुपमधील चौघांना अटक
गुन्हेगारीविषयक आरोप आणि तक्रारींमुळे सतत वादग्रस्त राहिलेले येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या नावाने असलेल्या ‘पीएल’ ग्रुपच्या चौघांना त्यांच्याच ग्रुपमधील दोघांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
या हत्या प्रकरणामुळे शहरातील काही राजकीय मंडळींचे गुन्हेगारांशी असलेल्या राजकीय संबंधांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.
त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोरंगण शिवारातील एका दरीत अर्जुन ऊर्फ वाटय़ा महेश आव्हाड (२६, अशोकनगर, सातपूर) आणि निखिल विलास गवळे (२२, गोपाळनगर, अमृतधाम) यांचे मृतदेह सापडले. महेशचा चुलता किरण आव्हाडने दिलेल्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात ३१ डिसेंबर रोजी वैतरणा येथील एका हॉटेलवर पार्टी झाली होती.
हॉटेलमधून मिळालेल्या माहितीनुसार प्रिन्स चित्रसेन सिंग, वतन शिवाजी पवार, सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर (२५, सावतानगर), निखिल निकुंभ (२४, खुटवडनगर, कामटवाडे) यासह इतर जण या प्रकरणामागे असल्याचे पोलिसांना कळले. मृतांपैकी अर्जुन आव्हाड ऊर्फ वाटय़ा हा नाशिकमधून तडीपार करण्यात आलेला गुंड असून निखिल गवळेविरुद्धही नाशिकमधील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. संशयित सराईत गुन्हेगार असून निकुंभ आणि सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर या दोघांना चोवीस तासाच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी या गुन्ह्य़ात वतन शिवाजी पवार (२७, दत्तनगर) आणि प्रिन्स चित्रसेन सिंग (२६, कामटवाडे) या अजून दोघांना अटक करण्यात आली. यापैकी पवार हा गोंदे वसाहतीतील लघू उद्योजक आहे.
या गुन्ह्य़ातील आरोपी हे सातपूर येथील नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्याशी संबंधित ‘पीएल’ ग्रुपचे सदस्य असून प्रिन्स सिंग याचा वाढदिवस असल्याने ३१ डिसेंबर रोजी वैतरणाजवळील हॉटेलमध्ये पार्टी ठेवण्यात आली होती. पार्टीत मद्याच्या नशेत आव्हाड आणि गवळे यांचा इतरांशी वाद झाला. दोघांनी इतरांना कुटुंबासह ठार मारण्याची धमकी देत पार्टी अर्धवट सोडली. दोघे त्याच रात्री सातपूरजवळील जगतापवाडीत असलेल्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात येऊन ते झोपले.
त्या ठिकाणी आलेल्या संशयितांनी कार्यालयात झोपलेल्या आव्हाड आणि गवळे यांच्यावर गावठी बंदुकीतून गोळ्या झाडल्या. त्यात दोघे जागीच ठार झाले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दोघांचे मृतदेह एन्डीव्हर कारमध्ये टाकून तोरंगण शिवारातील दरीत टाकून दिले होते. सदर गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.