नोटा बंदीचा फटका सर्वस्तरावर बसत असल्याने दैनंदिन व्यवहारात नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या एकंदर स्थितीची झळ मरणानंतरही बसल्याचे समोर आले आहे. सुटे पैसे नसल्याने बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्काराचे काम दिवसभर रखडले. सुटे पैसे जमल्यानंतर अखेरीस दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार करण्यात आले.

मनमाड-लासलगाव लोह मार्गावर बुधवारी सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून तो ताब्यात घेतला. नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांंना अंत्यसंस्कारासाठी बोलाविण्यात आले.

पण, रात्री उशिरापर्यंत सुटे पैसे न मिळाल्याने अंत्यविधी गुरुवारी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या कालावधीत बेवारस मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यास शीतगृह कार्यान्वित नव्हते. मागील आठ महिन्यांपासून हे शीतगृह बंद असल्याने मृतदेह दवाखान्याच्या एका भागात पडून होता. यामुळे परिसरात दरुगधी पसरण्यास सुरूवात झाली. दरम्यान, सकाळी कार्यकर्त्यांंनी पैसे जमविले.

पण मृतदेहावर टाकण्यासाठी कपडा, फु लांचा हार, पार्थिव रेल्वे स्टेशनवरून हातगाडय़ावरून ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी द्यावी लागणारी मजुरी तसेच तो पुरण्यासाठी जो खड्डा खोदावा लागतो, त्याची मजुरी असा सर्व खर्च ५०० रुपये होता. पण हे सर्व पैसे संबंधितांना सुटय़ा स्वरुपात द्यावे लागणार असल्याने ही कामे रखडली.

ही कामे करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे डॉ. आंबेडकर चौकातील  सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांनी नगरपालिका निवडणुकीतील प्रचार बाजूला ठेऊन त्यात लक्ष घातले.

त्यांच्या प्रयत्नामुळे बेवारस मृतदेहावर तब्बल ३० तासानंतर गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजता येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र मृतदेहातून येणाऱ्या दरुगधीमुळे कोणीही पुढे येण्यास तयार नव्हते.

सुटय़ा पैशांअभावी अडचण

सुटे पैसे नसल्याने कापड दुकानदाराने १५०, फुलहारवाल्याने ५० तर मृतदेह पुरण्यासाठी खड्डे खोदणाऱ्या मजुराने एक हजार रुपये सुटे देत असाल तरच काम करतो असे सांगितल्याने सर्वच ठिकाणी अडवणूक झाली. यामुळे मरणानंतरही मृतदेहाच्या मरण यातना सुरूच राहिल्याचा खेद वाटतो. शीतगृहाबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रार करूनही उपयोग झाला नाही.

विलास कटारे (सामाजिक कार्यकर्ते)