राज्य मार्गावर वणी चौफुलीजवळ हॉटेल व्यावसायिकांचे अतिक्रमण

वणी-कळवण राज्य मार्गावरील वणी चौफुलीजवळ महामार्गालगतच्या सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील हॉटेल व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून गाजत असून यासंदर्भात स्थानिक रहिवाशांकडून ओरड सुरू झाल्यावर उशिरा जाग आलेल्या वणी ग्राम पालिकेने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या नोटिसांचे स्थानिक रहिवाशांनी स्वागत केले असून नोटीस हा केवळ दिखाऊपणा न करता तातडीने कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे मत सप्तशंगी नगरमधील रहिवाशांनी मांडले आहे.

वणी-कळवण राज्यमार्गावरील गटनंबर ७२५/ २ मध्ये सव्‍‌र्हिस रस्त्याच्या बाजूला असलेले व्यावसायिकांचे अतिक्रमण स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखीचा विषय झाला आहे. कित्येक वर्षांपासून हे अतिक्रमण काढण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यात यश आले नाही. काहींनी या विरोधात न्यायालयही गाठले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. काही व्यक्तींनी सव्‍‌र्हिस रस्त्यावरील शासकीय जागेवर अतिक्रमण केले. नंतर तीच जागा धनदांडग्यांना व्यवसायासाठी भाडेतत्वावर दिली. प्रारंभी एक ते दोन हॉटेल व्यावसायिकांनी तंबू ठोकला. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल आणि इतर व्यवसायांची या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रांगच लागली. ग्राहक व व्यावसायिकांचे होणारे वाद, टवाळखोर उपद्रवींचा उच्छाद, यातून परिसरातील रहिवाश्यांना त्रास होऊ लागला. पुरुष मंडळी कामानिमित्त बाहेर गेल्यावर महिलांना या समस्येला अधिक प्रमाणावर तोंड द्यावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील कोणी दखल घेत नसल्याने अखेर येथील रहिवाशांनी संघटितपणे लढा देण्याचे ठरवून ग्रामपालिकेवर मोर्चा काढला. परंतु, अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांपुढे मवाळ भूमिका करणाऱ्या ग्रामपालिकेकडून केवळ आश्वासनाव्यतिरिक्त काही पदरी न पडल्याने लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात तक्रार करण्यात आली.

या तक्रारीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम, नगर रचना, पंचायत समिती दिंडोरी व वणी ग्रामपालिकेस या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कक्षातून देण्यात आले. तत्कालीन उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे यांच्याकडे याबाबत अन्य काही व्यक्तींनी हरकती घेतल्याने त्यात काही काळ गेला. त्यांनी रहिवाशांची बाजू योग्य असल्याचे सांगत गटविकास अधिकारी राहुल रोडके यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामपालिकेकडे त्यासंदर्भात आदेश आले. ग्रामपालिका निवडणूक होऊन सत्तान्तर झाले. नव्याने सत्तेवर आलेल्या मंडळींनी अतिक्रमण तातडीने काढून घेण्याविषयी नोटीस बजावली. नोटीसवर सरपंच सुनीता भरसट, उपसरपंच विलास कड, ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांची स्वाक्षरी आहे. ग्रामपालिकेने यापूर्वीदेखील या अतिक्रमित जागेवरील व्यावसायिकांविरुद्ध नोटीस काढली होती. परंतु, तो केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचा भाग झाला. त्यावेळी नोटीसची ना अतिक्रमणधारकांनी दखल घेतली, ना ग्रामपालिकेने पुढे पाठपुरावा केला. किमान यावेळी तरी नोटीस बजावणे हा एक देखावा न ठरता प्रत्यक्ष कार्यवाही करावी, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. नगर रचना विभागाने अतिक्रमण कुठपर्यंत आहे त्याची निशाणी करून दिल्यास ग्रामपालिका आपले काम करेल, असे ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांनी नमूद केले आहे.