‘लोकसत्ता लोकांकिका’ विभागीय अंतिम फेरीतून महाअंतिम फेरीत कोण पुढे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. त्यात आपलाच नंबर लागावा म्हणून विभागीय अंतिम फेरीसाठी महाविद्यालयीन संघ आता रंगीत तालमींमध्ये तल्लीन झाले आहेत. पालकवर्ग मात्र त्यांच्या अभिनय वेडाविषयी काहीसा संभ्रमित आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ नावलौकिक मिळवून आहे. स्पर्धेत काम करण्यास हरकत नाही, परंतु ‘करिअर’ म्हणून या क्षेत्राची निवड करण्यास पालकांचा काही अंशी विरोध आहे. पाल्यांच्या या नाटय़वेडाकडे ते कसे पाहतात हे त्यांच्याच शब्दात.

नाटक करू दे, पण नाशिकमध्येच

मोनाली नाटकाच्या तालमीत व्यस्त असल्याने अनेकदा तिला घरी फार वेळ देता येत नाही. मात्र तिची आवड, कलेवरचे प्रेम आणि ती स्वत:ला झोकून देत काम करतांना पाहून तिला आडकाठी करावीशी वाटत नाही. नाटक, सराव सांभाळूनही ती अभ्यास नियमित करते. प्रथम श्रेणी तिने सोडलेली नाही. अभिनयाच्या वेडापायी अभ्यासाकडे तिचे दुर्लक्ष होते असे अजिबात नाही. सध्याचे बिघडलेले वातावरण पाहून तिला नाशिक व्यतिरिक्त अन्य ठिकाणी नाटय़प्रयोगासाठी जाण्यास मनाई आहे. अभिनयाचा छंद जोपासण्यात गैर नाही. परंतु, करिअर म्हणून या क्षेत्राची निवड करण्यास विरोध आहे.

-अनिल डांगे (के.टी.एच.एम महाविद्यालयातील मोनालीचे पालक)

नोकरी करून अभिनयाकडे लक्ष द्यावे

याआधी कुटुंबातील कोणत्याच सदस्याने नाटक-सिनेमात काम केलेले नाही. त्यामुळे या क्षेत्राची फारशी ओळख नाही. तुषार करतो ते सर्व आमच्यासाठी नवीन असल्याने आधी त्याचे अभिनय वेड समजून घेणे अवघड गेले. त्याचा अभिनय पाहिल्यावर विरोध मावळला असला तरी धाकधूक अजूनही कायम आहे. आमची इच्छा काहीही असो ती त्याच्यावर लादण्यापेक्षा त्याच्या बाजूने उभे राहण्यात समंजसपणा आहे. त्याच्या तालमींसाठी अनेकदा पैसे लागतात. त्यासाठी जमवाजमवी करावी लागते. शेवटी मुलांच्या हट्टापुढे पालकांचा नाईलाज असतो. त्याने रितसर अभ्यास, शिक्षण सांभाळून नोकरी करावी आणि त्यानंतर  अभिनय करावा अशी इच्छा आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा विशेषत लोकसत्ता लोकांकिका सारख्या स्पर्धा ज्या माध्यमातून मुलांना त्यांना स्वतला जोखता येते, अशा स्पर्धामध्ये त्याने यापुढेही जरूर सहभाग घ्यावा.

– सुरेश पवार (म.स.गा, महाविद्यालयातील तुषारचे पालक)

मुलाने स्वतला आजमावे

एकुलता एक मुलगा असल्याने त्याला कोणत्याही गोष्टीसाठी कधी नकार दिला नाही. मुलाला नाटय़क्षेत्रात काम करावेसे वाटते. त्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण त्याचे जे स्वप्न आहे, तीच आमची इच्छा आहे. महाविद्यालयीन खास करून ‘लोकसत्ता लोकांकिका’सारख्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमुळे त्याला अनुभव मिळतो. या अनुभवातून त्याचा आत्मविश्वास वाढीस लागत आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी आम्ही त्याला सर्वतोपरी मदत देतो. त्याची  सिनेक्षेत्रात काम करण्याची इच्छा असली तरीही त्यातील असुरक्षितेची जाणीव त्याला वेळोवेळी करून दिल्याने अभ्यास, परीक्षा यांच्याकडे दुर्लक्ष न करता तो नाटकाच्या तालमींसाठी वेळ देतो. आम्हांला त्याच्या कलागुणांची ओळख असल्याने त्याने पुढील पाच वर्षे स्वत:ला या क्षेत्रात आजमावे. यानंतर निर्णय त्याचा असेल.

– ललिता पाटील (के.टी.एच.एम.

महाविद्यालयातील साहिलचे पालक)

मुलगी म्हणून निर्बंध नाही

मालेगावसारख्या लहान भागात राहून प्रियंका चंदेरी दुनियेचे स्वप्न बघते. त्यासाठी जमेल तशी मेहनत ती घेत आहे.  त्यामुळे तिचा अभिमान वाटतो. भविष्यात सिनेक्षेत्रात करिअर करण्याची तिची इच्छा असल्याने ती आतापासून कला विषयात अभिनयाशी संबंधित शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागाचा कुठलाही त्रास तिला होऊ नये हाच आमचा प्रयत्न असतो. मुलगी म्हणून या क्षेत्रात काम करायचे नाही, अथवा बाहेर जायचे नाही असे कुठलेच निर्बंध तिच्यावर नाही. स्वत:ला सांभाळून कष्ट करण्याची जिद्द तिच्यात दिसत असल्याने तिला  निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तिचे वडील आज हयात नाहीत. परंतु, त्यांच्यासाठी सिनेक्षेत्रात मोठे नाव कमाविण्याचे तिचे स्वप्न आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ त्यासाठी माध्यम ठरू पाहत आहे, असा विश्वास वाटतो.

– हर्षिता विश्वास

(म.स.गा महाविद्यालयातील प्रियंकाचे पालक)

प्रायोजक

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत लोकांकिका स्पर्धा ‘अस्तित्त्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘कमांडर वॉटर टेक प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘एम. के. घारे ज्वेलर्स’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे.बी.जी चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक् शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.