नाशिक – जिल्ह्यातील नाशिक या लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भाजपच्या डॉ. भारती पवार या महायुतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल केले. नियोजित वेळेपेक्षा फेरी उशीराने निघाल्याने फेरीतील गर्दी विखुरली गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महायुतीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी बी. डी. भालेकर मैदानापासून फेरी सकाळी ११ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, पूर्वनियोजित वेळेपेक्षा तीन तास उशीराने फेरीला सुरुवात झाली. उमेदवारांचा महाविजयी रथ १२ वाजता भालेकर मैदानावर आला. रथावर मोजक्या जणांना प्रवेश मिळाला. काही जणांनी प्रयत्न करुन पाहिले परंतु, त्यांना चढू देण्यात आले नाही. आमदारही यास अपवाद राहिले नाहीत. फेरी सुरू होण्यापूर्वी उमेदवारांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. फेरी टपाल कार्यालयापुढे मार्गस्थ होत असताना रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. काही अंतरापर्यंत ते फेरीत सहभागी होते. नागरिकांना अभिवादन करुन ते पुढील दिशेने मार्गस्थ झाले. ही फेरी ठाकरे गटाच्या शिवसेना कार्यालयाजवळ आली असता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कार्यालयाजवळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाच – इगतपुरीतील काही वाड्या, पाड्यांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

फेरीत पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरीसह अन्य भागातून लोक सहभागी झाले होते. फेरीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ यांच्यासह मित्रपक्षाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ फेरी आली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले. नाशिक मतदारसंघातून शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि दिंडोरीतून भाजपच्या डाॅ. भारती पवार यांनी अर्ज दाखल केले.

वाहतूक कोंडी

महायुतीच्या उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शनासाठी काढलेल्या फेरीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली. बी, डी. भालेकर मैदान, शालिमार, मध्यवर्ती बस स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर सिग्नल हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीत सापडला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना एक तासाहून अधिक काळ लागला. वाहतूक कोंडी, कार्यकर्त्यांचा उत्साह, पोलिसांच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरला. दरम्यान, गंजमाळ चौकाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा फेरीत सहभागी होण्यासाठी येत असताना वाहतूक कोंडीत सापडला. यामुळे ताफ्यासह फडणवीस यांच्या वाहनाला पुढे जाण्यात अडचणी येत असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री दादा भुसे यांनी स्वत: पुढाकार घेत इतर वाहने बाजूला करुन फडणवीस यांच्या ताफ्याला रस्ता करून दिला.

हेही वाचा – नाशिक : महायुतीच्या फेरीवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मशाल पेटवून घोषणाबाजी

व्यावसायिकांची चलती

महायुतीच्या शक्तिप्रदर्शनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी उन्हापासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमधून शीतपेय, कुल्फी, फुटाणे, शेंगदाणे, वडापाव, फळे खरेदी करुन ताव मारला. उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन अशाप्रकारे लहान व्यावसायिकांसाठी आर्थिक उलाढाल वाढविणारे ठरले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti show of strength in nashik ssb