मालेगाव महापालिका निवडणूक

राजकारणात विरोधकांवर तुटून पडण्यासाठी घराणेशाहीचा आरोप सतत केला जात असतो, पण असे आरोप करणारेही अनेकदा त्याच मार्गावरून जात असतात. घराणेशाहीच्या राजकारणाची ही परंपरा तशी मालेगावला नवीन नाही, परंतु या वेळच्या निवडणुकीत या परंपरेचा जाणवणारा चढता आलेख मात्र आश्चर्यकारक असाच म्हणावा लागेल.

निहाल अहमद (जनता दल)

प्रदीर्घ काळ मालेगाव शहरावर हुकमत गाजविणारे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे दिवंगत नेते निहाल अहमद यांच्यापासून घराणेशाहीच्या परंपरेला प्रारंभ होतो. समाजवादी चळवळीशी घट्ट नाळ जुळलेले साथी निहालभाई यांनी तब्बल सत्तावीस वर्षे विधानसभेत शहराचे नेतृत्व केले. २००१ मध्ये महापालिका अस्तित्वात येण्यापूर्वी नगरपालिका असताना निहालभाई यांनी पत्नी साजेदा यांना नगराध्यक्षपदी बसविले होते. १९९९ मध्ये काँग्रेसचे शेख रशीद यांच्याकरवी विधानसभेत त्यांना हार पत्करावी लागली.

महापालिका स्थापन करण्यास सतत नकारघंटा वाजविणारे व त्यासाठी न्यायालयीन दरवाजे ठोठाविणाऱ्या निहालभाईंनी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाल्यावर पहिले महापौर होण्याची किमया साधली. इतकेच नव्हे तर पक्षांतर्गत विरोधाची पत्रास न बाळगता पत्नी साजेदा यांना स्थायी समिती सभापती करण्यात त्यांनी धन्यता मानली होती. निहालभाई महापौर आणि पत्नी साजेदा स्थायी सभापती अशा सत्ताकेंद्री राजकारणामुळे घराणेशाहीचा आरोप करण्याची एकही संधी काँग्रेस तेव्हा सोडत नव्हती.

शेख रशीद (काँग्रेस)

जनता दलावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या काँग्रेसची वाटचालदेखील त्यापेक्षा वेगळी नव्हती. विधानसभेचे आमदार होण्यापूर्वी शेख रशीद यांनी नगराध्यक्षपद भूषविले होते. नंतर पहिल्या महापालिकेत त्यांचे पुत्र आसिफ शेख हे नगरसेवक होते. दुसऱ्या अडीच वर्षांत जनता दलात घाऊक फूट पाडत या आसिफ यांच्या डोक्यावर महापौरपदाचा मुकूट घालण्यात तत्कालीन आमदार शेख रशीद यशस्वी झाले होते. पिता आमदार व पुत्र महापौर अशी सत्तेची पदे एकाच घरात ठेवण्यात काँग्रेसच्या लेखी पुरुषार्थच होता. त्यानंतरच्या निवडणुकीत निहालभाई व त्यांची कन्या शान हे नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. शेख रशीद यांचे बंधू खलिल शेख व पुत्र आसिफ शेख हेही पुन्हा निवडून आले.

गेल्या निवडणुकीत शेख रशीद यांच्या पत्नी ताहेरा, त्यांचा दुसरा मुलगा खालिद हे विजयी झाले होते. ताहेरा यांना पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळाला होता. नंतर काँग्रेसकडून राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली तरी स्थायी सभापतिपद स्वत:कडे घेण्यात ताहेरा या यशस्वी ठरल्या होत्या. तर खालिद हे पालिकेत काँग्रेसचे सध्याचे गटनेते आहेत.

दिवंगत निहालभाई यांचे पुत्र बुलंद हे महापालिकेत वडिलांचा वारसा चालवत आहेत. याशिवाय एमआयएमचे स्थानिक सर्वेसर्वा व उपमहापौर युनूस इसा, त्यांचे पुत्र माजी महापौर अब्दुल मलिक, माजी नगराध्यक्ष असलेले एजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मिन बेग, गेल्या वेळी मालेगाव विकास आघाडीतर्फे निवडून गेलेले व सध्या भाजपात दाखल झालेले सुनील व मदन हे गायकवाड बंधू असा गोतावळा सध्या पालिकेत कार्यरत आहे.

यंदाच्या निवडणुकीतही घराणेशाहीची परंपरा कायम

आताच्या निवडणुकीत घराणेशाहीच्या परंपरेचा हा आलेख आणखी चढता असल्याचे अधोरेखित होत आहे. निहाल अहमद यांचे पुत्र बुलंद आणि कन्या शान हे भाऊ-बहीण जनता दल-राष्ट्रवादी आघाडीकडून नशीब अजमावत आहेत. बुलंद यांची टक्कर समाजवादी पक्षाकडून लढणारे त्यांचे सावत्र भाऊ इस्तियाक अहमद यांच्याशी होत आहे. पुत्र आसिफ शेख हे विधानसभेत निवडून गेल्याने काँग्रेसच्या शेख रशीद यांना आता सर्वसाधारण जागेसाठी असलेले महापौरपद खुणावत आहे. त्यामुळे या वेळी ते स्वत:, पत्नी ताहेरा व मुलगा खालिद असे तिघे रिंगणात उतरले आहेत. एमआयएमचे नेते व उपमहापौर युनूस यांनी तर या वेळी सर्वावर कडी केली आहे. ते स्वत:, माजी महापौर असलेले त्यांचे पुत्र अब्दुल मलिक, आणखी दोन्ही मुलगे व दोन सुना अशा एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना निवडणूक आखाडय़ात उतरविण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. विद्यमान नगरसेवक असलेले भाजपचे सुनील व मदन हे गायकवाड बंधू तसेच राष्ट्रवादीतर्फे स्थायी सभापती एजाज बेग व पत्नी यास्मिन बेग हे दाम्पत्य पुन्हा लढत देत आहेत. गेली अनेक वर्षे नगरसेवक असलेले माजी उपमहापौर सखाराम घोडके व त्यांची कन्या कल्पना वाघ हे दोन्ही शिवसेनेतर्फे उमेदवारी करीत आहेत. माजी उपमहापौर अ‍ॅड्. ज्योती भोसले या सेनेतर्फे, तर त्यांचे दीर माजी नगरसेवक अनंत भोसले हे अपक्ष नशीब अजमावत आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचे शालक जयराज बच्छाव हेही सेनेतर्फे निवडणूक आखाडय़ात उतरले आहेत.