मालेगावतील माणके गावात ‘घरोघरी अन् गल्लोगल्ली शिक्षण’

८०० लोकसंख्या असलेल्या माणके गावात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. चारही वर्गांच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ११२ इतकी असून बहुसंख्य मुलांचे पालक हे ऊसतोडणी मजूर आहेत.

|| प्रल्हाद बोरसे

माझे घर माझी शाळा, तरंगते वाचनालय, अंगण देते शिक्षण आदी विविध उपक्रम

मालेगाव : करोना संकटात ग्रामीण भागातील काही शाळांनी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे कमीक कमी शैक्षणिक नुकसान होईल असा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे दिसून येते. मालेगाव शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील माणके गावात ‘घरोघरी अन् गल्लोगल्ली शिक्षण’ हा आगळा उपक्रम राबविण्यात आला. 

८०० लोकसंख्या असलेल्या माणके गावात जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. चारही वर्गांच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या ११२ इतकी असून बहुसंख्य मुलांचे पालक हे ऊसतोडणी मजूर आहेत. करोना संकटात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला खरा,परंतु तेथील बहुसंख्य पालकांकडे आधुनिक भ्रमणध्वनी नसल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे शक्य झाले नाही. सध्या जी मुले दुसरीत शिकत आहेत, ती वर्षभर शाळेचे तोंड न बघताच पुढच्या वर्गात ढकलली गेली.

मुलांच्या होणाऱ्या या शैक्षणिक नुकसानीबद्दल गावचे उपसरपंच स्वप्नीन देवरे आणि शाळेतील शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातून यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली भामरे यांनी ‘शिक्षणाचे गाव’ ही संकल्पना मांडली. गावकऱ्यांच्या सर्वोतोपरी सहकार्याने गेल्या स्वातंत्र्यदिनापासून या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली. उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापक योगेश शेवाळे, शिक्षिका दिपाली शिंदे यांनी प्रयत्न केले. उपक्रमात  भिंती बोलू लागल्या, माझे घर ही माझी शाळा, तरंगते वाचनालय (हँगिंग लायब्ररी), अंगण देते शिक्षण या बाबींचा समावेश केला गेला. ‘भिंती बोलू लागल्या’ उपक्रमात गावातील किमान ५०भिंतींवर विद्यार्थ्यांसाठीचे उपयुक्त अभ्यास घटक रंगविण्यात आले. खेड्यात अंगणात सडा-रांगोळी करण्याचा प्रघात असतो. ही बाब हेरुन संख्या,मुळाक्षरे,मराठी व इंग्रजी शब्दांच्या वेगवेगळ्या रांगोळ्या घरांपुढे साकारणे नित्यनेमाणे सुरु केले गेले. 

विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून गावातील चार प्रमुख चौकांमध्ये शाळेतर्फे ‘तरंगते वाचनालय’ (हँगिंग लायब्ररी) सुरु करण्यात आले. या वाचनालयाच्या ठिकाणी वेगवेगळे कप्पे असणारी मोठी पिशवी टांगून ठेवली जाते. एका वाचनालयात अशा प्रकारे ४० ते ५० पुस्तके पिशवीच्या कप्प्यात ठेवली जातात. ही पुस्तके दर आठवड्याला बदलली जातात. गोष्टी, गाणी,कविता,प्रार्थना असणाऱ्या पुस्तकांचा यात समावेश असतो. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी धार्मिक आणि मोठ्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके या ठिकाणी ठेवली जातात. वाचनालयाच्या नियोजनाची जबाबदारी गावातील जेष्ठ व तरुण पार पाडत आहेत.

या उपक्रमासाठी लागणारा  आर्थिक भार लोक वर्गणीतून भागवला जात आहे. शिवाय शिक्षिका भामरे या अध्यक्षा असलेल्या एस फाउन्डेशन या सेवाभावी संस्थेच्या ज्योती पाटील, छाया देसले, मनीषा ठाकूर याही याकामी आर्थिक योगदान देत आहेत.

करोना काळात मुलांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्वाची असल्याने गावकऱ्यांच्या सहकार्याने शैक्षणिक उपक्रम सुरु करण्यात आला. आता त्याचे अत्यंत सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्याबरोबरच अवघ्या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे.  – वैशाली भामरे, (उपक्रमशील शिक्षिका,माणके, मालेगाव.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Manke village in malegaon home to home teaching akp

Next Story
राज ठाकरेही साधू-महंतांच्या दर्शनार्थ
ताज्या बातम्या