अतिरिक्त २० मेट्रिक टनसाठी प्रयत्न

नाशिक : करोनाच्या संकटात प्राणवायूचा तुटवडा भासत असून जिल्हा प्रशासन अधिकचा २० मेट्रिक टन प्राणवायू प्राप्त होण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेक खासगी रुग्णालयात निकषापेक्षा अधिक प्राणवायू वापरला जातो. या व्यवस्थेतील त्रूटी दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.आता प्रशासनाने रुग्णालयांतील प्राणवायू वापराचे परीक्षण सुरू केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूच्या टंचाईची मोठी झळ जिल्ह्यास बसत आहे. रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली. त्यातील गंभीर रुग्णांना प्राणवायूची निकड भासते. ही संख्या जवळपास साडेतीन हजार इतकी आहे. प्राणवायूसज्ज खाटा न मिळाल्याने काही रुग्णांना प्राण गमवावे लागले.

प्राणवायूअभावी रुग्णालये रुग्णांना खाटा देत नाहीत. प्राणवायूचा पुरवठा आणि वितरण यासाठी प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त दत्तप्रसाद नडे यांच्या आधिपत्याखाली नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सध्या सुमारे ११० मेट्रिक टन प्राणवायूची मागणी आहे. जिल्ह्यत प्राणवायू उत्पादन करणारे तीन उत्पादक आहेत. द्रवरूप प्राणवायूवर प्रक्रिया करून पुरवठा करणारे आठ परवानाधारक आहेत. त्यांना मुरबाड, चाकण आणि पेण येथून प्राणवायू प्राप्त होतो.

शहरास साधारणपणे ९० मेटिक टन प्राणवायू प्राप्त होतो. त्या व्यतिरिक्त १५ मेट्रिक टनचे उत्पादन तीन उत्पादक करतात. मागणी-पुरवठय़ातील तफावतीने टंचाईची स्थिती निर्माण होते. प्राणवायूच्या वाहतुकीसाठी दोन उत्पादकांकडे टँकर आहेत. तिसरे उत्पादक टँकर खरेदीच्या प्रयत्नात आहेत. एकाकडे टँकर नसल्याने त्यांना नियमितपणे प्राणवायू मिळत नाही. मालेगावातील खासगी रुग्णालयांना प्राणवायू

देणारे पुरवठादार औरंगाबादहून सिलिंडरमध्ये तो भरून आणतात. अतिरिक्त २० मेट्रिक टन प्राणवायू प्राप्त होण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे अन्न, औषध प्रशासन विभागाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी सांगितले.

प्राणवायूच्या व्यवस्थापनाची निकड

शासकीय मापदंडाच्या तुलनेत रुग्णालयांकडून दुप्पट, तिप्पट प्रमाणात प्राणवायूचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाचा कोटा निश्चित करण्यात आला. प्राणवायू वापराबाबत शासनाचा निकष १० ते २० लिटर प्रतिमिनिट आहे. काही रुग्णालये १३० ते १५० लिटर प्रति मिनिट असा वापर करीत आहेत. रुग्णालयांनी वापरात बदल करावा, व्यवस्थेत गळती आहे काय, याची तपासणी करण्याची सूचना मध्यंतरी करण्यात आली होती. प्राणवायूचे सर्वत्र संकट असल्याने रुग्णालयांनी उपलब्ध साठय़ाचे योग्य व्यवस्थापन, वापर करावा, असा प्रशासनाचा आग्रह आहे. या अनुषंगाने रुग्णालयाच्या प्राणवायू वापराचे परीक्षण करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.