नाशिक – शहरातील पाथर्डी-वडनेर रस्त्यावर शालेय विद्यार्थी वाहतुकीच्या बस अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले. दुसऱ्या मोटारीचे टायर फुटून हा अपघात झाल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते.  शालेय बस थेट रस्ता सोडून लगतच्या शेतात गेली. इस्पॅलियर स्कूलची ही बस असून इयत्ता चवथी व दुसरीत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आहेत. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

गुरुवारी दुपारी साडेतीन ते चार या वेळेत हा अपघात झाला. शाळा सुटल्यानंतर चालक विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघाला होता. वाटेत काही विद्यार्थ्यांना सोडल्यानंतर चार विद्यार्थ्यांना घेऊन बस पाथर्डी, वडनेरच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी भरधाव येणाऱ्या  मोटारीचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. अकस्मात टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या बसकडे गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला जाण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून उतरून शेतात गेली. अपघातात मोटार चालक जखमी झाला. तर बसमधील चार विद्यार्थ्यांना डोक्याला, तोंडाला किरकोळ जखमा झाल्या. स्वराज वाघमारे, ईश्वरी निमसे, आयुरा जोशी व सिग्ना चव्हाण अशी या विद्यार्थ्यांची नावे असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>>घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली. याच वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख या मार्गावरून जात होते. त्यांनी थांबून मदतीसंदर्भात सूचना केल्या. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, बसमधील चारही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल व प्रकृती सामान्य असल्याचे शाळेचे संचालक सचिन जोशी यांनी सांगितले. बस चालक सुरेश साळवे यांनी प्रसंगावधान राखल्याने विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झाली नसल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या मोटारीमुळे हा अपघात झाला, त्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुध्द इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.