राज्यात प्लास्टिकच्या वापरावर व निर्मितीवर कडक निर्बंध टाकत बंदी टाकून वर्ष उलटले तरी अद्याप छुप्या पद्धतीने प्लास्टिक निर्मिती मोठय़ा प्रमाणत सुरू असल्याचे नवी मुंबईतील दोन कारखान्यांवर टाकलेल्या छाप्यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. नवी मुंबई पालिकेने बुधवारी बेलापूर व पावणे एमआयडीसीत केलेल्या कारवाईत सुमारे १५ ट्रक प्लास्टिक जप्त केले आहे. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी मार्च महिन्यात प्लास्टिकवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. यात ज्याच्याकडे प्लास्टिक, थर्माकोलच्या वस्तू किंवा त्याचा वापर आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचा आदेशच शासन स्तरावर काढण्यात आलेला होता. परंतु अद्यापही असंख्य ठिकाणी छुप्या पद्धतीने प्लास्टिक निर्मिती व वापर सुरूच आहे.

नवी मुंबई शहरात तर राज्याने बंदी घालण्या अगोदरपासूनच प्लास्टिकवरनिर्बंध आहेत. मात्र अधूनमधून होत असलेल्या कारवायांमधून व प्लास्टिकचा सुरू असलेला वापर पाहता प्लास्टिक बंदी आहे का? असाच प्रश्न नेहमी पडत असतो. नवी मुंबईत गेल्या वर्षभरात महापालिकेने केलेल्या कारवाईत सुमारे ३० टन प्लास्टिक जप्त केले आहे. बुधवारी एका दिवसात केलेल्या कारवाईत १५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

बेलापूर सेक्टर २० येथील सावन हार्मनी इमारतीच्या मागे प्लॉट नं. ८४ वरील इमारतीत १० टनाहून अधिक प्लास्टिक व थर्माकोलच्या साठय़ावर धाड टाकून हे साहित्य जप्त करण्यात आले, तर बेलापूर येथील कारवाईमध्ये सापडलेल्या चलनामध्ये नामोल्लेख असणाऱ्या पावणे एमआयडीसी येथील प्लॉट नं.३३९ वरील गाळा क्र. ९ मध्ये असलेल्या गामी इंडस्ट्रियल इस्टेट पॉलीप्रॉपिलीन बॅग निर्मिती ठिकाणी घातलेल्या धाडीत छापा टाकून पालिका अधिकारी यांनी ५ टनापेक्षा अधिक नॉन ओव्हन पॉलीप्रॉपिलीन बॅग व त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील यांच्यासमवेत साठा असलेल्या ठिकाणी पाहणी करत कारवाई केली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी इंद्रजीत देशमुख हेदेखील उपस्थित होते.

दुकानदारांकडून ५३५ किलो प्लास्टिक जप्त

होळी व धुलिवंदन सणांच्या अनुषंगाने परिमंडळ एकमधील बेलापूर, नेरुळ, वाशी व तुर्भे येथील प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या ३५ दुकानदारांवर धडक कारवाई करून १ लाख ६८ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. या कारवाईत दुकानदारांकडून ५३५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.