News Flash

‘विष्णुदास’मध्ये नाटय़कलेसोबत साहित्यसेवेचेही दालन!

नाटय़गृहातील अनेक सुविधा ह्य़ा जुन्या काळातील असल्याने त्यांचा परिणाम दिसून येत नाही.

नवी मुंबईचे एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ असणारे वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृह नव्याने कात टाकणार असून नाटय़गृह परिसरात वाचनालय किंवा पुस्तक दालन सुरू करण्याचा प्रशासन विचार करीत आहे. २० वर्षांपूर्वी सिडकोकडून हस्तांतरीत करून घेण्यात आलेल्या या नाटय़गृहातील अनेक सुविधा ह्य़ा जुन्या काळातील असल्याने त्यांचा परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे अनेक वेळा रसिकांचा भ्रमनिरास झाला आहे.
भौगोलिक रचनेचे मुंबईएवढेच नवी मुंबईचे क्षेत्रफळ असून लोकसंख्या कमी असल्याने वाशी येथे एकच सांस्कृतिक सभागृह सिडकोने सर्वप्रथम बांधले होते. फेब्रुवारी १९९६ रोजी पालिकेने हे सिडकोकडून हस्तांतरित करून घेतले आहे. त्यानंतर सिडकोने नेरुळ येथे आगरी कोळी सांस्कृतिक सभागृह उभारले आहे, पण त्याला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही. नवी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भावे नाटय़गृहाला नाटय़रसिकांबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय मंडळींची पहिली पंसती आहे. त्यामुळे तोटय़ात चालणाऱ्या या नाटय़मंदिरावर पालिकेने अनेक वेळा डागडुजीचे सोपस्कार केल्यानंतरही परस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येते. ऐन कार्यक्रमात पावसाच्या पाण्याचा अभिषेक होणे, डास, उंदीर, झुरळ यांनी कार्यक्रमात व्यत्यय आणणे, खुच्र्याचा मागील भाग तेलतंवगाने काळा ठिक्कर पडणे अशा अनेक समस्या नाटय़गृहाची ‘शोभा’ वाढवीत असतात. त्यामुळे शहराचे एकमेव सांस्कृतिक व्यासपीठ नीटनेटके करण्याचा पालिका प्रशासनाने विचार केला असून त्याची तयारी सुरू केली आहे. त्यात नवीन आलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांची वक्रदृष्टी या समस्यांकडे जाण्यापूर्वी त्या सोडविण्याचा प्रशासनाचा मानस आहे. यात मळकटलेल्या खुच्र्या बदलणे तसेच नवीन कार्पेट टाकण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी खराब झालेल्या कार्पेटमुळे प्रेक्षकांना साष्टांग नमस्कार घालावे लागले आहेत.
आधुनिकतेचा स्वीकार करताना नादुरुस्त सीसी टीव्हींच्या जागी नवीन सीसी टीव्ही बसविले जाणार असून २० वर्षे जुनी वातानुकूल यंत्रणा बदलण्याचा विचार केला जात आहे. नवनवीन ध्वनी यंत्रणाचा आविष्कार केला जात असताना भावे नाटय़गृहात २२ वर्षे जुन्या साऊंड सिस्टीमवर दिवस काढले जात आहेत. त्यामुळे उस्ताद झाकीर हुसेनसारख्या दिग्गज कलाकाराच्या कार्यक्रमात रसिकांना भ्रमनिराशा सहन करावी लागली आहे. याशिवाय बाहेरील भिंतीचे प्लास्टर कोसळण्याची शक्यता वर्तवली जात असून पार्किंगच्या समस्यावर दोन्ही प्रवेशद्वार खुले करण्याची उपाययोजना केली जाणार आहे. प्रशासकीय कार्यालय व व्यवस्थापक यांची दालने एखाद्या गुफेसारखी कोपऱ्यात असून सर्वसामान्य प्रेक्षकांना सहज जाणे त्या ठिकाणी शक्य होत नाही. त्यामुळे ही दालने पारदर्शक केली जाणार आहेत. या सर्व कामांसाठी पावसाळ्यात भावे नाटय़गृह काही महिन्यासाठी बंद राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 5:41 am

Web Title: administration decided to start book library in vishnudas bhave natyagruha
Next Stories
1 उरणमध्ये नालेसफाई; गाळ काठावरच
2 उरणला दोन राष्ट्रीय महामार्गाची जोड
3 कंत्राटदाराचे पैसे थेट बँक खात्यात
Just Now!
X