पूनम धनावडे

नाशिवंत मालाच्या अल्पावधीत लिलावाविषयी व्यापारी साशंक

राज्यातील सर्व बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (ई-नाम) माध्यमातून एकाच छताखाली आणण्याची योजना सरकारने आखली असून वाशीतील एपीएमसी बाजारात ती डिसेंबरअखेर लागू होणार आहे. मात्र प्रत्यक्षात प्रशासन ही योजना कशी हाताळणार आहे याबाबत व्यापारी वर्गात मोठा संभ्रम आहे. प्रत्येक बाजारात ही प्रणाली स्थिर होण्यासाठी किमान दोन वर्षे लोटतील, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.

एपीएमसीच्या पाच बाजार समित्यांमध्ये १० हजार व्यापारी आहेत. या बाजारात प्रत्यक्ष बोली लावून लिलाव पद्धतीने व्यापार केला जातो. ई नाम योजनेत हा लिलाव ऑनलाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्यापारी आणि ग्राहकाला ई-नाम पोर्टलवर समाविष्ट करण्यात येईल. त्यानंतर विशिष्ट अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी-व्यापारी, अडते ऑनलाइन बोली लावून विक्री करतील. ज्याचा बाजारभाव सर्वाधिक असेल, त्याला तो माल खरेदी करता येणार आहे. मात्र सध्या बाजारात मुख्य प्रवेशद्वारावर शेतमालाची नोंद होते, त्यानंतर वेगवेगळ्या श्रेणीनुसार शेतमालाची विभागणी होते. एका मोठय़ा गाडीत अनेक शेतकऱ्यांचा माल येतो. ग्रेडनुसार विभागणी होऊन त्यांनतर माल खरेदी केला जातो. ई नाम योजना लागू झाल्यानंतर शेतमालाची वर्गवारी, श्रेणी कोण आणि कशी ठरवणार, त्याची विभागणी कशी करणार, असे प्रश्न व्यापारी आणि ग्राहकांना भेडसावत आहेत. योजना किती व्यवहार्य ठरेल याची खात्री, पडताळणी प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी व्यापारी करत आहेत.

ई-नाम योजनेबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ अध्यक्ष कैलास तांजणे यांनी सांगितले.

‘डिसेंबरमध्ये ई नाम योजनेला सुरुवात होणार असून यामध्ये कांदा, बटाटा बाजार, तसेच भाजीपाला व फळ बाजारातील मोठय़ा प्रमाणात दाखल होणाऱ्या शेतमालाचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यांनतर इतर बाजार समित्यांना या प्रणालीत समाविष्ट करून घेण्यात येईल,’ असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.

‘योजनेची केवळ प्रसिद्धी न करता प्रत्यक्षात अंमलबजावणी किती फायदेशीर असेल याची पडताळणी करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा,’ अशी मागणी मसाला बाजारातील व्यापारी कीर्ती राणा यांनी केली.

कांदा-बटाटा बाजारापासून सुरुवात

सध्या ७० टक्के शेतमालाची नोंद ही संगणकीय पद्धतीने केली जात आहे. अडते, व्यापारी यांची ७० टक्के नोंद झाली असून डिसेंबरमध्ये प्रणाली लागू करण्यात येईल, असे एपीएमसीतील सूत्रांनी सांगितले. एपीएमसीच्या मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर ई- लिलाव केंद्राचे काम चालणार आहे. सुरुवातीला कांदा-बटाटा बाजार, मोठय़ा प्रमाणात दाखल होणाऱ्या मिरची, भेंडी, कोबीसारख्या भाज्या आणि फळ बाजारात आंबा, सफरचंद, या शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी ई-लिलाव सुरू करण्यात येणार आहे. त्यांनतर टप्प्याटप्प्याने इतर बाजारांतही ही योजना सुरू होणार आहे.

ई- लिलावाची पद्धत

* ई नाम पोर्टलवर अधिकृत शेतकरी, नोंदणीकृत व्यापारी, अडते, बाजार समिती कर्मचारी, शासकीय यंत्रणांना समाविष्ट करून घेण्यात येईल.

* आवक गेटवर शेतकऱ्यांनी मालाची नोंद करण्यात येईल. शासकीय कर्मचारी ती नोंद संकेतस्थळावर करतील. शेतकऱ्यांच्या ओळखपत्रानुसार मलाला संकेतस्थळावर एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल.

* आलेल्या शेतमालाची वर्गवारी करण्यात येईल. प्रयोग शाळेत गुणवत्ता तपासणी केली जाईल.

* ई नाम पोर्टलवर ई-लिलाव प्रक्रिया करण्यात येईल. विकलेल्या शेतमालाचा नियमानुसार व्यवहार केला जाईल

* जावक गेटवर नोंद करण्यात येईल.

या प्रणालीची अंमलबजावणी भाजीपाला बाजारात कठीण आहे. कमी वेळेत शेतमालाची वर्गवारी, गुणवत्ता तपासणी कशी शक्य आहे? योजना या बाजारात फोल ठरेल.

– संजय पिंपळे, व्यापारी, घाऊक फळ बाजार, एपीएमसी