राष्ट्रवादी, शिवसेनेसाठी अटीतटीची लढत

पाच अपक्ष आणि दहा काँग्रेस नगरसेवकांच्या बळावर अडीच वर्षे नवी मुंबईचे महापौरपद टिकविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी यंदाची निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. निवडणूक प्रक्रियेत काँग्रेसच्या १० नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असून त्यातील सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीबरोबर जाण्यात स्वारस्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींना कळविले आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा एकगठ्ठा पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडला जाऊन साकडे घातले आहे.

नवी मुंबई पालिकेच्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पालिकेतील १११ नगरसेवकांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस ५२, शिवसेना ३८, काँग्रेस १०, भाजप ६ आणि अपक्ष ५ असे संख्याबळ आहे. बहुमतासाठी ५७ जागा जिंकणे आवश्यक होते. राष्ट्रवादीने पाच अपक्षांच्या बळावर ही संख्या गाठली आहे. यात अपक्ष असलेले पण राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले सुधाकर सोनावणे यांना महापौरपद देण्यात आले. केवळ पाच अपक्षांच्या बळावर सत्तेची जोखीम स्वीकारणे योग्य नसल्याने राष्ट्रवादीने मित्रपक्ष काँग्रेसच्या १० नगरसेवकांचाही पाठिंबा मिळविला. त्याबदल्यात त्यांना उपमहापौरपद व काही विशेष समित्यांचे सभापतिपद देण्यात आले.

अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादीतील मतभेद उफाळून आला असून काही नगरसेवक पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. काही जणांना शिवसेना, भाजपबरोबर जाण्याचे वेध लागले आहेत. काँग्रेसच्या १० नगरसेवकांना तर राष्ट्रवादीचा घरोबा नकोसा झाला आहे. त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसचे नेते व आमदार भाई जगताप यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या समोर काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या अडीच वर्षांतील असहकाराचा पाढा वाचला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसने युती करून महापौर अथवा नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. तोच प्रयोग यंदा नवी मुंबईत करावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसच्या १० नगरसेवकांचा एकगठ्ठा पाठिंबा मिळावा यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे नांदेड येथील घर गाठले आणि त्यांना साकडे घातले.

काँग्रेसच्या १० नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यास शिवसेनेच्या आशा मावळणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांचा घोडेबाजार जोरात सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून कोटय़वधींच्या बोली लावल्या जात आहेत.

राष्ट्रवादीने अद्याप महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. यात ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतार, डॉ. जयाजी नाथ, अशोक गावडे, विनोद म्हात्रे, वृषाली नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे येथील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक हे शेवटच्या क्षणी या पदाच्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत. शिवसेना, भाजपने उमेदवार ठरविला असून हा सत्ताबाजार हातळणारे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी गेले दोन महिने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील असंतुष्ट नगरसेवकांची दिवाळी कशी चांगली जाईल याची काळजी घेतली गेली आहे.

काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी साथ दिल्यास शिवसेनेला सत्तासोपान गाठता येण्यासारखा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनीही दंड थोपटले असून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना अज्ञातवासात घेऊन जाण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

राष्ट्रवादीचे ७ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

दिघा येथील अपात्रतेची टांगती तलवार असलेले राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक शिवसेनेच्या गळाला केव्हाच लागले असून ते खुलेआम चौगुले यांच्या समर्थनासाठी उतरले आहेत. वाशी येथील एका नगरसेवकाने महापौर निवडणुकीपर्यंत परदेशवारी करण्याचा निर्णय घेतला आहे तर सत्तेचा वापर करून तुर्भे येथील एक नगरसेवक अपात्र ठरविला जाण्याची शक्यता आहे. त्याचा निर्णय पालिका आयुक्तांवर सोपविण्यात आला आहे. याच त्रिकुटातील एक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सात व अपक्ष दोन नगरसेवक यावेळी शिवसेनेला साथ देण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हे नगरसेवक सहा वर्षांची अपात्रता टाळता यावी यासाठी गैरहजर अथवा उपचारार्थ रुग्णालयात दाखल होण्याचे मार्ग स्वीकारतील, अशी शक्यता आहे.