नवी मुंबई : हापूस आंबा प्रेमींसाठी एक गोड बातमी आहे. जागतिक तापमान वाढीचा फटका बसत असल्याने हापूसची आवक कमी होत होती. भावही चढेच होते. त्यामुळे खरेदीदारांची निराशा झाली होती. मात्र गुरुवारी वाशीतील फळबाजारात हापूसची या हंगामातील सर्वाधिक आवक झाली आहे. चार हजार पेटय़ा बाजारात दाखल झाल्या असून भावही निम्याने कमी झाले आहेत.

जागतिक तापमानवाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्याला बसू लागल्या होत्या. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. फेब्रुवारीमध्ये अवघ्या २०० ते २५० पेटय़ांची नोंद झाली होती. त्यामुळे पाच किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार पाच ते नऊ हजार रुपये इतका दर मिळत होता. पुढील काळातही आवक कमीच राहणार असल्याची शक्यता होती. एपीएमसी बाजारात यावर्षी हापूसचा हंगामदेखील १ ते दीड महिना उशिरा सुरू झाला होता. बाजारात कमी प्रमाणात हापूस दाखल होत होता. त्यामुळे आंबा प्रेमींची निराशा झाली होती.   गुरुवारी पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणात हापूसच्या पेटय़ा बाजारात दाखल झाल्या आहेत. ४ हजार पेटय़ांची आवक झाली असून या वर्षांतील आतापर्यंतची ही सर्वात मोठी आवक आहे. ५ ते ६ डझनच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार २ ते ६ हजार ५०० रुपये बाजारभाव आहे. यापूर्वी तो पाच ते नऊ हजार रुपये इतका होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड येथील हापूस बाजारात दाखल झाला असून १० एप्रिलनंतर हापूसची आवक अधिक वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या वर्षी पाऊस लांबल्याने एपीएमसी बाजारात कमी प्रमाणात हापूस आंबा येत होता. गुरुवारी पहिल्यांदा चार हजार पेटय़ा दाखल झाल्या आहेत. १० एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होईल.

-संजय पानसरे, घाऊक फळ व्यापारी, एपीएमसी