उपचाराधीन रुग्ण ५५०पेक्षा कमी झाल्याने दिलासा

नवी मुंबई : दुसऱ्या लाटेतील निर्बंध शिथिलीकरणानंतर ५० वर स्थिर असलेली करोना रुग्णसंख्येत वाढ होत ती १०० पर्यंत गेली होती. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खरेदीसाठी झालेली गर्दी पाहता रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत होती. मात्र १०० वर असलेली दैनंदिन रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. तर उपचाराधीन रुग्णही कमी होत ५५० पर्यंत खाली आले आहेत.

नवी मुंबई शहरात पहिली करोना लाट नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ओसरली होती. त्यानंतर टाळेबंदी शिथिलीकरणानंतर झपाटय़ाने रुग्णवाढ झाली होती. या काळातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या ही ११ एप्रिल २०२१ रोजी ११,६०५ इतकी नोंदवली गेली होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेत शहरातील आरोग्य परिस्थिती गंभीर झाली होती. ही पूर्वपरिस्थिती पाहता दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका शहरावर कायम आहे.

महिनाभरात नवे रुग्ण १००च्या आतच आढळून येत आहेत. तसेच शहरातील करोनाबाधितेचे प्रमाण व उपचाराधीन रुग्णही कमी असल्याने शहरात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी खबरदारीचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे शहरात रुग्णवाढीचा धोका होता. मात्र अद्याप रुग्णसंख्या स्थिर असल्याने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. शहरातील परिस्थिती अत्यंत नियंत्रणात असली तरी धोका कायम आहे.  करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पालिका प्रशासन सतर्क असून चाचण्यांची संख्या कायम ठेवण्यात आली आहे. ज्या सोसायटीत रुग्ण सापडत आहेत, त्या सोसायटीतील सर्व रहिवाशांची चाचणी करण्यात येत असल्याने प्रादुर्भावावर नियंत्रण असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.  २९ जुलैपासून करोना रुग्णांची संख्या १००च्या आत आहे. १६ ऑगस्टला सर्वात कमी २६ नवे रुग्ण सापडले तर १७ ऑगस्टला ३५ नवे रुग्ण सापडले होते. परंतु आता नवे रुग्ण शंभपर्यंत आहेत. पालिकेने शहरातील ६९०० खाटांची व्यवस्था वाढवून ती १२ हजार खाटांची  केली जात आहे. पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या २० ऑगस्टला ४७७ होती. दुसऱ्या लाटेत ही संख्या ४ एप्रिलला १४४१ पर्यंत गेली होती. करोना उपचार घेणारे रुग्ण कमी झाले असून शहरात उपचाराधीन रुग्णसंख्याही ५५० च्या खाली झाली आहे. पण दैनंदिन रुग्ण अचानक वाढण्याची भीतीही प्रशासनाला आहे.

रुग्णवाढीचा धोका कायम

करोना रुग्णसंख्या स्थिर आहे, याचा अर्थ धोका टळला असे म्हणता येणार नाही. नियमांचे पालन झाले नसले तर त्याचे परिणाम साधारण २० दिवसांनी दिसून येतील, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.