शहरातील दोन मॉलमध्ये उपक्रमाची सुरुवात

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना करोना प्रतिबंध लस घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी मुंबई महापालिकेने वाहनतळात सुरू केलेली ‘ड्राइव्ह इन लसीकरण केंद्र’ मोहीम नवी मुंबईतही सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी दोन मॉलच्या पार्किंगमध्ये याची सुरुवात करण्यात आली असून पहिल्या दिवशी १४६ जणांचे लसीकरण करण्यात आले.

शहरात सध्या पालिकेच्या चार रुग्णालये व २३ नागरी आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. मात्र लस तुटवडा असल्याने या केंद्रांरही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक व शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना लसीकरणाच्या रांगत तिष्ठत उभे रहावे लागत आहे. या नागरिकांची गैरसोय होत असल्याने मुंबई महापालिकेने दादरच्या कोहीनूर मॉलच्या वाहनतळात गाडीतच लस देण्याचा ‘ड्राइव्ह इन लसीकरण’ उपक्रम सुरू केला आहे. त्या धर्तीवर नवी मुंबइ महपालिकेनेही या उपक्रमाची शहरात सुरुवात केली आहे.

गुरुवारी सीवूड्स येथील ग्रँड सेंट्रल मॉल आणि वाशीतील इन ऑर्बिट मॉलमध्ये हे लसीकरण सुरू करण्यात आले. दुपारी एक वाजलेपासून लसीकारण सुरू झाले, मात्र सकाळी अकरा वाजलेपासूनच येथील पार्किंगमध्ये वाहने घेऊन नागरिक उपस्थित होते. दिवसभरात इन ऑर्बिट मॉलमध्ये ६६ जणंचे तर ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ८० जणांचे असे एकूण १४६ जणांचे लसीकरण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात दोन ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. लस उपलब्धता झाल्यानंतर या केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे.

असे होते लसीकरण

ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक व्यंग असलेल्या व्यक्तींना या ठिकाणी लसीकरण केले जाते. आपल्य वाहनातून ते लसीकरण केंद्रावर आल्यानंतर प्रवेशद्वारावर आधारकार्डवरील सर्व माहिती घेत त्यांना कुपन दिले जाते. त्यानंतर ते वाहन पार्किंगमध्ये जाऊन प्रतीक्षेत थांबवले जाते. त्यांना गाडीत बसूनच प्रतीक्षा करावी लागते. नंबर आल्यानंतर त्यांच्याकडे आरोग्य पथक जात त्यांना लस दिली जाते. यानंतर किमान अर्धा तास गाडीत थांबून घरी पाठवले जाते.

एपीएमसीमध्ये शंभर जणांचे लसीकरण

एपीएमसीत ४५ वर्षांवरील बाजार घटकांसाठी महापालिका प्रशासनाने लसीकरण केंद्र गुरुवारपासून सुरू केले असून पहिल्याच दिवशी शंभर जणांना लस देण्यात आली. एपीएमसीमधील पाचही बाजारांत टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

लस तुटवडा कायम

नवी मुंबई :  बुधवारी लससाठा प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी लसीकरण सुरू होते. मात्र शुक्रवारी लस उपलब्ध न झाल्यास पुन्हा तुटवडा निर्माण होणार आहे.  शुक्रवारी सकाळी लस प्राप्त होणार असल्याने दुपारपासून कोविशिल्डची दुसरी मात्रा दिली जाणार आहे, तर १८ ते ४४ वयोगटाची पहिली मात्रा व ‘ड्राइव्ह इन लसीकरण’ सुरू राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.