पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्राची जबाबदारी प्रशासकांच्या खांद्यावर असल्याने महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामाची सूत्रे हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामाची सूचना विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्यावर बुधवारी प्रत्यक्ष नालेसफाई सुरु असताना अचानक आयुक्त डॉ. रसाळ यांनी भेट देऊन काम करणाऱ्या कंत्राटदाराला धक्का दिला.

सध्या कळंबोली आणि कामोठे या परिसरातील नालेसफाई सुरु असून उर्वरीत खारघर व पनवेल शहरातील नालेसफाईची कामे शासनाच्या परवानगीनंतर पालिका सुरु करणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली व कामोठे परिसरातील नालेसफाईची कामे करण्यासाठी पालिका सुमारे चार कोटी रुपये खर्च करणार आहे. कंत्राटदाराला पुढील दोन वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ९ येथील कळंबोली विभागामधील खिडुकपाडा गाव परिसरातील नाले साफसफाई सूरु असलेल्या कामाची पाहणी पालिका आयुक्त डॉ. रसाळ यांनी केली.

हेही वाचा…उलवे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीला पाणी पुरवठा शुक्रवार ते शनिवार बंद राहणार

यावेळी पालिका उपायुक्त डॉ. वैभव विधाते, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, मलनिस्सारण विभाग प्रमुख किरण जाधव, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे आणि स्वच्छता निरीक्षक अमित जाधव हे अधिकारी उपस्थित होते. सध्या कामोठे व कळंबोलीमध्ये नालेसफाईसाठी कळंबोलीमध्ये २ पोखलन, २ जेसीबी, २ टिपर, २ टिपर, १७० मनुष्यबळ कार्यरत असून कामोठे वसाहतीमध्ये ९३ मनुष्यबळाच्या साह्याने नालेसफाई होत असल्याची माहिती डॉ. वैभव विधाते यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नाले व गटारांमधील साचलेला गाळ सफाईचे काम सुरु असल्याचा दावा पालिकेने केला आहे.