नववर्षांच्या स्वागतासाठी उरण तालुका आणि परिसरातही जोरदार तयारी सुरू झाली असून वेगवेगळे बेत आखले जात आहेत. या स्वागत कार्यक्रमांवर करडी नजर ठेवण्यासाठी उरण पोलिसांनी योजना आखली असून कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नववर्षांच्या स्वागतासाठी मद्य पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर तसेच डीजेच्या तालावर रात्री उशिरापर्यंत नाचणाऱ्यांवर बंधने येणार आहेत.
नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेक गट तसेच सोसायटय़ा कामाला लागल्या आहेत. या दिवशी जास्तीत जास्त ग्राहक यावेत याकरिता उरणमधील हॉटेल व्यावसायिकांनीही योजना आखल्या आहेत. उरणला समुद्रकिनारा लाभल्याने दरवर्षी उरणच्या पिरवाडी किनाऱ्यावर हजारो पर्यटक नववर्षांचे स्वागत करतात. या धुंदीत काही अनुचित घटनाही घडत असल्याने कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली आहे. नववर्षांचे स्वागत करताना इतरांना उपद्रव होईल अशा आवाजात गाणी लावू नयेत, दारू पिऊन धिंगाणा घालू नये व वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे नाचगाणी करू नयेत, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.