नवी मुंबई : सीवूड्स भागात एका मोठ्या बिल्डरकडून बांधकामाचा पाया खणताना केल्या जाणाऱ्या मोठ्या स्फोटांमुळे लगतच असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याचे प्रकरण ताजे असताना नवी मुंबई महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील इतर भागांत असे प्रकार अजूनही सर्रासपणे सुरू असल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसू लागले आहे.

महापालिकेचे आयुक्तपद राजेश नार्वेकर यांच्याकडे असताना त्यांनी या प्रकरणी बिल्डरांच्या प्रतिनिधींची एक तातडीची बैठक सीवूड्स येथील घटनेनंतर बोलावली होती. याच काळात नार्वेकर यांची बदली झाल्याने महापालिकेच्या नगरविकास विभागाच्या लेखी हे प्रकार पुन्हा एकदा क्षुल्लक ठरू लागल्याची चर्चा आता सुरू झाली असून सीवूड्ससह शहराच्या इतर भागांतही सायंकाळी उशिरापर्यंत या स्फोटांची मालिका सुरू झाली आहे.

हेही वाचा – पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश

निवासी भागात कोणत्याही प्रकारच्या खोदकामांसाठी अशा प्रकारच्या मोठ्या आवाजाच्या शक्तिशाली स्फोटांची परवानगी नाही. असे असताना वाशी, नेरुळ, सीवूड्स, कोपरखैरणे या उपनगरांमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत बिल्डरांकडून असे स्फोट घडविले जात असून त्यालगत असणाऱ्या निवासी संकुलांमधील रहिवाशांमध्ये यामुळे घबराटीचे वातावरण आहे.

वाशीसारख्या उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. ही कामे हाती घेत असताना सुरक्षाविषयक नियमांची ऐशीतैशी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. वाशी सेक्टर नऊ तसेच आसपासच्या परिसरात अशा बांधकामांसाठी खोदकामे करताना जागोजागी खडक, मुरुम लागत आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या विकास नियमांवलीत बिल्डरांवर वाढीव चटईक्षेत्राचा वर्षाव करण्यात आला असून वाहनतळाचे नियमही बंधनकारक करण्यात आले आहेत. या वाहनतळांसाठी इमारतीखाली बेसमेंट काढण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात खोदकाम करावे लागत आहे. या खोदकामासाठी जागोजागी सुरुंग स्फोट घडविले जात असून या नियंत्रित स्फोटाची क्षमता तपासणारी यंत्रणाच अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती असल्यामुळे लगत राहणाऱ्या निवासी संकुलातील रहिवाशी हैराण झाले आहेत.

नवे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मध्यंतरी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. या बैठकीत हा महत्त्वाचा विषय चर्चेस येणे आवश्यक होते. या बैठकीनंतरही यासंबंधीची नियमावली अजूनही गुलदस्त्यात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंबंधी महापालिकेचे सहाय्यक नगररचनाकार सोमनाथ केकाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही.

महापालिकेचा नगररचना विभाग चिडीचूप

सीवूड्स येथील एका बड्या बांधकाम व्यावसायिकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचा पाया खोदत असताना अशाच प्रकारचे स्फोट केले गेले. स्फोटामुळे लगतच्या एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. या बिल्डरने तातडीने बांधकाम थांबवावे अशा तोंडी सूचना नगररचना विभागाने दिल्या. त्यानंतर हे काम काही आठवडे थांबले. इतर भागात मात्र असे स्फोट सुरूच होते. सीवूड्स येथील घटनेनंतर बिल्डरांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलावण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिल्या होत्या. स्फोटासंबंधी नियमांची अंमलबजावणी करावी असेही या बैठकीत ठरविण्यात येणार होते. परंतु, नार्वेकर यांची बदली झाली आणि नगररचना विभाग अचानक शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सिडकोच्या जवळपास सर्वच इमारतींचे वयोमान हे २० किंवा २५ वर्षांपेक्षा अधिक आहे. या इमारतींना लागूनच असे मोठे स्फोट घडविले जात असतील तर ते धोकादायक आहे. महापालिका, पोलीस यंत्रणेने स्फोट घडवून करण्यात येणाऱ्या खोदकामांच्या ठिकाणी जाऊन नियमित पाहणी करायला हवी. महापालिकेने ठोस अशी नियमावली आखायला हवी. परंतु नगररचना विभाग या आघाडीवर नेमक करतो काय हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात अनुत्तरित आहे. – विजय घाटे, उपाध्यक्ष, भाजप, नवी मुंबई</p>

हेही वाचा – पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये

वाशीत बांधकामांच्या ठिकाणी स्फोट घडविले जात आहेत. पुनर्विकास प्रकल्पांना महापालिका परवानगी देत असताना रहिवाशांच्या सुरक्षेचे काय याचे उत्तर कोण देणार हा मुख्य प्रश्न आहे. नगर नियोजन, बांधकाम करताना घ्यावयाची काळजी, नियमांची अंमलबजावणी यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या नगर रचना अधिकाऱ्यांची नाही का? – पीयूष पटेल, रहिवासी, वाशी सेक्टर २

रस्ताही गिळंकृत

वाशी सेक्टर २ येथील व्यावसायिक संकुलाच्या बांधकाम ठिकाणाचा परिसरच संबंधित बिल्डरच्या व्यवस्थापनाने गिळून टाकल्याचे चित्र आहे. या संकुलास अॅबट हॉटेलकडील बाजूस असलेल्या १५ मीटरच्या रस्त्याचा एक भाग बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने, काँक्रीट पुरवठा करणाऱ्या यंत्रणांनी अवैधपणे बळकाविला आहे. वाशी वाहतूक पोलीस मात्र याकडे ढुंकूनही पाहात नाहीत.