कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बऱ्याच भारतीय चित्रपटासाठीसुद्धा झालाय.

काही वर्षांपूर्वी आलेल्या हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘कोई मिल गया’ या हिंदी चित्रपटात वापरले गेलेले ‘जादू’ हे त्याचे उदाहरण आहे.

हल्लीच्या पिढीला माहीत असलेले उदाहरण म्हणजे ‘बाहुबली’ हा चित्रपट. या चित्रपटात दाखविले गेलेले हत्ती, घोडे हे प्राणी अगदी खरे आहेत असे वाटते, संगणकाने निर्माण केलेल्या प्रतिमांचा वापर करून हे साध्य झाले आहे. वेगवेगळी सॉफ्टवेअर्स वापरून तयार केलेल्या त्याच सिनेमातला महालसुद्धा खराच आहे असा भासतो. अशी बरीच उदाहरणे अनेक भारतीय चित्रपटांतही हल्ली नजरेस पडतात. अशा कॉम्पुटरमार्फत निर्माण केलेल्या आभासी सेटची बरीच उदाहरणे अनेक भारतीय चित्रपटांतही हल्ली नजरेस पडतात. ‘झपाटलेला’ या मराठी चित्रपटातसुद्धा निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारेंनी ‘तात्या विंचू’ हे पात्र याच पद्धतीने दाखविले आहे.

हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेचे सिनेअवतार

पूर्वी गाण्याच्या ध्वनिमुद्रणासाठी बरीच वाद्ये आणि ती वाजवणारे वादक लागत, पण कालांतराने प्रचलित झालेल्या ‘सिंथसायझर’ या इलेक्ट्रॉनिक वाद्यांतून वेगवेगळी वाद्ये वाजविली जातात, हासुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच एक प्रयोग म्हणावा लागेल. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान यांनी नुकताच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक नवा प्रयोग केलाय. त्यांनी दिवंगत गायक बंबा बाक्या आणि शाहूल हमिद यांचा उपलब्ध आवाज वापरून रजनीकांत यांच्या नव्या ‘लाल सलाम’ या चित्रपटासाठी एक गीत ध्वनिमुद्रित केले आहे.

‘ग्लोबल डेटा’नुसार इ.स. २०३० च्या पुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राने संपूर्ण चित्रपट निर्मिती शक्य आहे. कथानक, चित्रपटातील पात्रांना दिग्दर्शन करणे, ध्वनिमुद्रण, चित्रीकरण, संपादन आणि एकंदरीतच चित्रपटाची सारी अंगे कृत्रिम बुद्धिमत्ता सांभाळेल अशी शक्यता वर्तवली जातेय. चित्रपटातील पात्रे मात्र मानवी पात्रे असतील. मानवी पात्राला बदलण्याइतपत विचारशक्ती यंत्रांना आली नाही असे म्हटले जातेय. रॉबी मार्टिन आणि केली पोर्टर यांनी ‘डिसोलेशन अननोन’ नावाचा एक भयपट निर्माण केला. तीन भागांच्या या भयपटातील पहिला भाग पूर्णत: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राच्या साहाय्याने चित्रित केला गेला आहे. पूर्ण चित्रपटच मुळी कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची जोड व मदत घेऊन बनवला गेला आहे. 

– उज्ज्वल निरगुडकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org