कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील चित्रपटांच्या निर्मितीत  २५ जून, १९८२ ला प्रदर्शित झालेल्या ब्लेड रनर या चित्रपटात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने बनविलेले ‘रोबोट’ मानवजातीला संरक्षण देण्याचेही काम करतात. या ‘रोबोट’मध्येही भावभावना रुजवता येतात,  ही संकल्पना या चित्रपटामध्ये मांडली होती. ज्यात प्रतिकृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृत्रिम मानवांना अंतराळातल्या वसाहतींत (स्पेस कॉलनी) काम करण्यासाठी शक्तिशाली ‘टायरेल कॉर्पोरेशन’ने बायो-इंजिनीअर म्हणून प्रस्तृत केले आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हॉलीवूडच्या चित्रपटांची संख्या खूपच आहे. बहुतेक चित्रपट हे पुढे प्रगत होणाऱ्या,  भविष्यकालीन विज्ञान शोधांवर आधारित गाजलेले चित्रपट म्हणजे द मॅट्रिक्स, रोबोट, एआय- आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘द मॅट्रिक्स’मधला रोबोट माणसाच्या अवतारात वागतो. एजंट स्मिथचा संवेदनशील अवतार म्हणजेच हा रोबोट. रोबोट हे पात्र फक्त हार्डवेअर नाही तर,  सॉफ्टवेअरसुद्धा आहे याची तो प्रकर्षांने जाणीव करून देतो. त्याच काळातल्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे १९८४ मधला ‘टर्मिनेटर’!

‘टर्मिनेटर’चे पुढे अनेक भाग निघाले, त्यापैकी ‘टर्मिनेटर- २’ या चित्रपटामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने तयार झालेली दृश्ये बघून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. त्यातल्या मोटरसायकलवरच्या थरारक दृश्याने लहानथोर भारावून गेले  होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू या टर्मिनेटर शृंखलेत पाहावयास मिळतात.

२०२३ साली अमेरिकेत निर्माण केल्या गेलेल्या ‘क्रिएटर’ या चित्रपटात कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी बुद्धिमत्तेवर कुरघोडी केल्याचे दाखवले आहे.

‘एआय’ अर्थातच ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा वापर करून नवीन प्रकारची मशिन्स दाखविणे,  नवनवीन आणि वेगळया प्रकारचे रोबोट दाखविणे त्याचप्रमाणे परग्रहांवर जीवन कसे असेल, तिथले प्राणी / मानव पृथ्वीवर आल्यावर काय होईल या विविध शास्त्रीय काल्पनिकांमुळे बरेच चित्रपट गाजले.

सनस्प्रिंग हा लघु चित्रपट कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राची मदत घेऊन केला आहे. बेंजामिन या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राने त्याचे कथानक लिहिले असून कॉरपस या विज्ञान कथेतील बीजावर ते आधारित आहे.

चित्रपटांत एआय  किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर एक खलनायक म्हणूनच जास्त वेळा दाखविला गेला आहे, कारण म्हणजे मानवी शक्तीच्या मर्यादांपलीकडे जाऊन विध्वंस करणारी एक शक्ती वापरून प्रत्यक्ष जीवनात अस्तित्वात नसलेले खलनायक दाखविण्यात येतात आणि नंतर त्याच शक्तीवर मात करून विजय प्राप्त करणारे नायक दाखविल्यामुळे, मानवी नायकच नेहमी जास्त शक्तिमान वाटतात.

– उज्ज्वल निरगुडकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org