नीरज राऊत
पालघर : गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना श्वान दंश तर ४१८२ नागरिकांना सर्पदंश झाला असून येणाऱ्या पावसाळय़ाच्या कालावधीत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातून होणाऱ्या दंशवर तसेच श्वान दंशवर औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. दंश झालेल्या रुग्णांच्या देखभाल व उपचारांसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये अहोरात्र सेवा उपलब्ध असून आरोग्य कर्मचाऱ्यांना या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात शल्यचिकित्सक विभागाच्या अंतर्गत नऊ ग्रामीण रुग्णालय व तीन उपजिल्हा रुग्णालय अशा १२ आरोग्य केंद्रांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या अंतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी सर्पदंश, विंचू व श्वान दंश यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील जव्हार, पालघर, वाडा व डहाणू तालुक्यात सर्प दंशचे प्रमाण जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी येथे ४१८२ नागरिकांना तर सन २०२०-२१ मध्ये २९१२ नागरिकांना सर्पदंश झाला होता. त्यापैकी गेल्या वर्षी जव्हार येथील पाच रुग्णांसह नऊ नागरिकांचा सर्पदंशामुळे मृत्यू ओढवला होता. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात शल्य चिकित्सक अंतर्गत आरोग्य केंद्रांत सुमारे पाच हजार तर विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात सात हजार सर्पदंश लस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात विंचू दंशाने दीड हजारपेक्षा अधिक नागरिक बाधित होत असून त्यांच्यावर शासकीय आरोग्य केंद्रात उपचार करण्याची सुविधा आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, वाडा व डहाणू या तालुक्यातील शहरी भागात तसेच ग्रामीण भागातील नगरपंचायत क्षेत्रांमध्ये श्वान दंशचे प्रमाण अधिक असून गेल्या वर्षी जिल्ह्यात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना श्वान दंश झाल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे करोना संक्रमणाचा प्रभाव असणाऱ्या सन २०२०-२१ दरम्यान देखील श्वान दंश झालेल्या नागरिकांची संख्या १५ हजारांच्या जवळपास असल्याचे दिसून आले होते. सध्या शल्यचिकित्सक विभागांतर्गत आरोग्य केंद्राकडे १४ हजार तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ४१ हजारांपेक्षा अधिक श्वान दंशवर इंजेक्शन उपलब्ध आहेत.

Survey, Finds 58 percentage Indians, Suffer from Mosquito Bites, Affecting sleep, Affecting Productivity, Mosquito Bites, Indians Mosquito Bites, gcpl survey,
डासांमुळे निम्म्या भारतीयांची होतेय झोपमोड; महाराष्ट्रासह पश्चिम भारताला बसतोय सर्वाधिक फटका
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण

सर्पदंश, विंचू दंश झालेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी आणल्यास त्यांना त्या सर्पदंशावरील औषधोपचार दिला जातो. विषारी सापामुळे रुग्ण गंभीर असल्याचे वाटल्यास त्याला जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात येते. बिनविषारी सर्पदंश असल्यास रुग्णाला देखरेखीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात काही काळ दाखल करण्यात येते असल्याचे सांगण्यात आले.


कोब्रा दंश घातक
अनेक प्रसंगी नाग (कोब्रा) व इतर विषारी प्रजातीच्या सापाचा दंश झाला व अशा रुग्णाला प्रथमोपचार मिळण्यास विलंब झाला तर रुग्ण गंभीर होण्याचे प्रकार घडत असतात. कोब्रा व अन्य काही विशिष्ट प्रजातींच्या सर्पदंशामुळे रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रकार घडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. विषारी व बिनविषारी सर्प दंश ओळखण्यासाठी व सर्प दंशावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे नियमितपणे प्रशिक्षण आयोजित केले जात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

श्वानांची संख्या मर्यादित राखण्याचे आव्हान
जिल्ह्यातील श्वान दंशाचे प्रमाण शहरी तसेच किनारपट्टीच्या भागात अधिक असून महानगरपालिका, नगरपालिकेने मोकाट श्वानांची संख्या मर्यादित राखण्यासाठी नसबंदी कार्यक्रम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील गावांपैकी अनेक ठिकाणी किनाऱ्यांवर अंत्यविधी केले जातात, अशा वेळी शिल्लक राहिलेल्या मानवी अवशेषांचे श्वानांकडून सेवन होऊन ते हिंसक होण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसून आले आहे. या दृष्टीने नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.