पालघर:  पालघर जिल्ह्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल ९१.७७ टक्के  इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ७.७५ टक्क्य़ांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी बारावीचा निकाल ९९.५२  टक्के इतका होता. पालघर जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९२.९२ टक्के  तर मुलांचा निकाल ९०.८६  टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल जव्हार तालुक्याचा (९७.३२ टक्के)  आहे.   त्यापाठोपाठ मोखाडा व तलासरी तालुक्याचा निकाल ९५ टक्क्यांच्या जवळपास आहे. विक्रमगड, पालघर, वाडा, वसई, विक्रमगड तालुक्याचा निकाल ९० ते ९२ टक्क्यांच्या दरम्यान आहे.डहाणू तालुक्याचा निकाल यंदा (८०.८२ टक्के) कमी लागला आहे.  तालुक्याच्या निकालात सुमारे २० टक्क्यांनी घसरण झाली. गेल्या वर्षी डहाणू तालुक्याचा निकाल ९९.९३ टक्के इतका होता.  बारावीसाठी पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ४८०९४   विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४४१४०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४३७३ मुले तर १९७६७  मुली आहेत.  पुन:परीक्षेला बसलेल्या १०६२  विद्यार्थ्यांपैकी ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान,गेल्या वर्षी करोनाकाळ असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या. तसेच महाविद्यालयामार्फत मूल्यमापन व इतर प्रकारचे गुण दिल्यामुळे विद्यार्थ्यांचा व एकूण निकाल वाढला होता. या उलट यंदा प्रत्यक्ष परीक्षा द्यावी लागल्याने हा निकाल गेल्या वर्षीपेक्षा कमी लागला.

सर्व शाखांचा निकाल कमी

गेल्या वर्षीपेक्षा यंदा विविध शाखांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. विज्ञान शाखेचा यंदाचा निकाल ९६.७४ टक्के आहे. गेल्या वर्षी हा निकाल ९७.३ टक्के इतका होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा या शाखेत १.८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. कला शाखेतील यंदाचा निकाल ८६.३०  टक्के इतका आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ९९.८७ टक्के होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत कला शाखेच्या निकालामध्ये यंदा १३.५७  टक्क्यांनी घसरण झाली आहे.वाणिज्य शाखेचा यंदाचा निकाल ९१.४८  टक्के आहे. गेल्या वर्षी तो ९९.८९  टक्के होता.त्या तुलनेत यंदा ८.४१ टक्क्यांची घसरण येथे झाली आहे.

विषयनिहाय निकाल 

विषय   विद्यार्थी उत्तीर्ण   टक्के

विज्ञान  १४५२१  १४०४९  ९६.७४ 

कला    ११३०८  ९७५९   ८६.३०

वाणिज्य २१७२६  १९८७६  ९१.४८

कौशल्य ५३१    ४५० ८२.५५