वाहतूक कोंडीसह पादचारी, किराणा दुकानदार त्रस्त

पालघर : पालघर शहरात मोकाट गुरांचा धुडगूस गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. कळपाने फिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतूक कोंडी होत असून पादचारी नागरिक, किराणा व्यापारी व दुकानदार आदी त्रस्त आहेत. मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडे कोंडवाडे नाहीत. पालघर शहरासह लगतच्या गावांतील मोकाट गुरांचे प्रमाण वाढले आहे. या गुरांचे मालक त्यांना वाऱ्यावर सोडत असल्याने मिळेल त्या वाटेने व खाद्य मिळणाऱ्या शहराच्या ठिकाणी हे कळप हिंडत आहेत. शहरातील कचरा फेकण्याच्या जागा, पदपथ, रस्ते, किराणा दुकाने अशा ठिकाणी ही गुरे कळपाने ठाण मांडून राहत आहेत. शहरात कचरा फेकला जाणाऱ्या ठिकाणी ही गुरे चरत असतात. त्यामुळे हा कचरा सर्वत्र पसरतो व परिसर अस्वच्छ होतो. याचबरोबरीने ही गुरे पादचारी मार्गावर बसत असल्याने नागरिकांना पदपथावरून चालताना त्रास होत आहे. परिणामी नागरिक रस्त्यावरून चालताना दिसतात. शहरातील किराणा मालाची किरकोळ व घाऊक दुकाने आहेत त्या भागात तर ही गुरे धुडगूस घालत आहेत. दुकानाबाहेर विक्रीसाठी खाण्यालायक ठेवलेले सामान गुरे फस्त करीत आहेत. त्यामुळे दुकानदारांचे मोठे नुकसान होत आहे. कळपाने फिरत असलेली ही गुरे कुठेही घाण करत असल्यामुळे रस्ते व इतर परिसर शेणाने विद्रूप झाल्याचे दिसून येतो. भर रस्त्यात या गुरांचा कळप हिंडत असल्यामुळे पालघर शहरातील विविध रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. भटक्या जनावरांमुळे जुना सातपाटी रोड येथे अपघात घडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. तर माहीम रस्त्यावर अनेक वेळा लहान-मोठे अपघात या जनावरांमुळे घडलेले आहेत.

पालघर नगर परिषद क्षेत्रात ही गुरे हिंडत असताना नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र नगर परिषदेच्या प्रारूप विकास आराखडय़ात भटक्या गुरांसाठी व जनावरांसाठी कोंडवाडय़ाचे आरक्षणच ठेवले गेलेले नाही. त्यामुळे या गुरांवर कारवाई कशी करावी, असा प्रश्न नगर परिषदेला पडत आहे. मात्र नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्यासाठी नगर परिषदेला वेळ नसल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. भटक्या गुरांचा बंदोबस्त करून त्यांच्या मालकांनाही दंड करावा, जेणेकरून ते आपली गुरे मोकळी सोडणार नाहीत अशी मागणी होत आहे.

शहरात दिवसाढवळ्या फिरणारी ही मोकाट गुरे त्रासदायक ठरू लागली आहेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. या जनावरांच्या मालकांना दंड ठोठवावा किंवा गोठय़ात पाठवा. जो मालक जनावरांवर दावा करेल त्याला दंड करावा.

– सवाराम चौधरी, अध्यक्ष, रिटेल किरणा माल असोसिएशन, पालघर

वारंवार याविषयी प्रशासनाला सांगितल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. पुढे नागरिकांसह आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला जाण्याशिवाय पर्याय नाही.

– भावानंद संखे, विरोधी गटनेता, पालघर नगर परिषद

तत्कालीन मंजूर झालेल्या सदोष प्रारूप विकास आराखडय़ात कोंडवाडा आरक्षणच ठेवले नसल्याने आता हा प्रश्न उद्भवत आहे. आता आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. पशुपालकांनीही आपली गुरे वाऱ्यावर सोडून नागरिकांना त्रासदायक ठरेल असे कृत्य करू नये, असे सांगण्यात येत आहे.

– डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षा, पालघर नगर परिषद