लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : बारावी निकालाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाइन जाहीर झाला. पालघर जिल्ह्याचा निकाल ९६.०७ टक्के तर वसईचा निकाल ९७.४१ टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

राज्य शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची परीक्षा मार्च महिन्यात घेतली होती. या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून ६१ हजार ४३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६१ हजार १३४ इतके विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सोमवारी दुपारी १ वाजता शिक्षण मंडळाने संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात दहावीचा निकाल जाहीर केला. यात ५८ हजार ७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३० हजार ६५७ मुलं तर २८ हजार ७८ मुलींचा समावेश आहे.

आणखी वाचा-मुंबई विभागाचा निकाल ९५.८३ टक्के, गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ

उत्तीर्ण होण्यात मुलींनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मुले उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.२८ टक्के आहे तर मुली उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.९५ टक्के आहे. तर जिल्ह्याचा एकूण निकाल ९६.०७ टक्के लागला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. निकालापूर्वी पालक व विद्यार्थी यांच्यात धाकधूक होती. मात्र निकालानंतर विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी व पालक यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे समाज माध्यमावर ही अभिनंदनाचा वर्षाव सुरू असल्याचे पहायला मिळाले.

वसईचा निकाल ९७ टक्के

मागील शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत वसईच्या निकालाची टक्केवारी वाढली आहे. मागील वर्षी ९५.४५ टक्के इतका निकाल लागला होता. मात्र यंदा वसईचा निकाल ९७.४१ टक्के इतका लागला आहे. त्यामुळे वसईच्या निकाल हा २ टक्क्यांनी वाढला आहे. वसईतून १९ हजार ८३६ मुलं व १६ हजार ४०१ मुली अशी एकूण ३६ हजार २३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३५ हजार ३०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १९ हजार १८४ मुलं व १६ हजार ११७ मुलींचा समावेश आहे.

आणखी वाचा-सांगली: आंबा महोत्सवात ४७ जातींचे आंबे

तालुका निहाय टक्केवारी

वसई – ९७.४१ टक्के
वाडा- ९३.७० टक्के
मोखाडा- ९१.३१ टक्के
विक्रमगड- ९४ ५४ टक्के
जव्हार – ९५.८६ टक्के
तलासरी- ९२.४३टक्के
डहाणू- ९०.८०टक्के
पालघर- ९६.८८ टक्के
एकूण निकाल- ९६.०७ टक्के