सांगली : सांगलीत कृषी विभाग व पणन महामंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंबा महोत्सवात तब्बल ४७ प्रकारचे आंबे उपलब्ध करण्यात आले होते. स्थानिक भागात तयार झालेल्या केसर आंब्याला महोत्सवात चांगली मागणी आढळून आली असून तीन दिवसात लाखो रूपयांची उलाढाल या आंबा महोत्सवात झाली.

उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेअंतर्गत सांगलीतील कच्छीभवन येथे तीन दिवसांचा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कृषि पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ, कृषी उपसंचालक श्री. पाटील व आंबा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा : दिव्यांग मुलींच्या स्वच्छतेची ‘जागृती’, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनविशेष

या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, स्थानिक केशर आंबा व इतर विविध जातींचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. स्थानिक शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या केसर आंब्याला चांगली मागणी झाल्याचे उत्पादक विराज कोकणे यांनी सांगितले. तथापि, आंबा महोत्सव हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात आयोजित करण्याऐवजी हंगामाच्या मध्यावर सुरू केल्यास अधिक ग्राहकांना लाभ तर घेता येईलच, पण याचबरोबर उत्पादकांच्या दर्जेदार मालाला चांगला दरही मिळेल असे त्यांनी सांगितले.