-
बिग बॉस हा टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोपैकी एक आहे. बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान हा शो होस्ट करतो. नोव्हेंबर २००६ मध्ये सुरू झालेल्या बिग बॉसचे १४ सीझन झाले आहेत. आता १५वा सीझन सुरू आहे. बिग बॉसच्या इतिहासात आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला आहे.
-
मात्र, आतापर्यंत गेल्या १४ सीझनमध्ये क्रीडाविश्वातील एकही खेळाडू बिग बॉस जिंकू शकलेला नाही. बिग बॉसमध्ये क्रीडा जगतातील कुस्तीपटू आणि क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. संग्राम सिंग, द ग्रेट खली आणि सोनिका कालीरामन सारखे कुस्तीपटू या शोचा एक भाग बनले आणि खली चौथ्या सत्रात उपविजेता देखील होता. तर या शोमध्ये क्रिकेटपटूही सहभागी झाले होते.
-
सलील अंकोला – भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण २१ सामने खेळले, ज्यात २० एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्याचा समावेश आहे. १९९८ मध्ये दुखापतीमुळे निवृत्त झाल्यानंतर सलील टीव्ही इंडस्ट्रीकडे वळला आणि नाव कमावले. दरम्यान, तो अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दिसला. याशिवाय त्याने २००६ मध्ये बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही भाग घेतला होता. परंतु त्याला पहिल्या आठवड्यातच घराचा निरोप घ्यावा लागला.
-
विनोद कांबळी – भारतीय संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी देखील बिग बॉससारख्या रिअॅलिटी शोचा भाग बनला आहे. भारतासाठी १७ कसोटी आणि १०४ एकदिवसीय सामने खेळलेला विनोद कांबळी या प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सत्रात सहभागी झाला होता. विनोद कांबळी या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आला होता, पण तो जास्त काळ घरात राहू शकला नाही. विनोद कांबळी ३३ व्या दिवशी घरात आला होता आणि ४८ व्या दिवशी घरातून बाहेर पडला.
-
नवज्योतसिंग सिद्धू – भारतासाठी ५१ कसोटीत ३२०२ धावा आणि १३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४१३ धावा करणारे नवज्योतसिंग सिद्धू २०१२ मध्ये बिग बॉसच्या सहाव्या सत्रात सहभागी झाले होते. नवज्योतसिंग सिद्धू जवळपास ५ आठवड्यांपासून घरात होते आणि खूप चांगले काम करत होते, परंतु त्यांना ३५व्या दिवशी घरातून बाहेर जावे लागले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धू सध्या राजकारणातही खूप सक्रिय आहेत.
-
श्रीशांत – अलीकडेच बंदी संपल्यानंतर पुन्हा एकदा व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा श्रीशांत देखील या प्रसिद्ध शोचा एक भाग होता. २०१३ मध्ये फिक्सिंगसाठी बंदी घातल्यानंतर, श्रीशांत वेगवेगळ्या क्षेत्रात दिसला आणि २०१८ मध्ये आलेल्या बिग बॉसच्या १२ व्या सीझनचाही तो एक भाग होता. या शोच्या यशात श्रीशांतचा मोठा हात होता आणि यादरम्यान त्याने आपल्या क्रिकेट करिअरबद्दल अनेक खुलासेही केले. इतर क्रिकेटपटूंच्या तुलनेत श्रीशांतने चांगली कामगिरी केली असली, तरी तो जिंकू शकला नाही.या सीझनमध्ये तो उपविजेता ठरला होता.
-
अँड्र्यू सायमंड्स – ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्स बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये पाहुणा म्हणून घरात आला होता. सायमंड्सने ६७ व्या दिवशी घरात प्रवेश केला आणि दोन आठवड्यांच्या आत बाहेर गेला. (सर्व फोटो ट्विटर आणि सोशल मीडियावरून साभार)

लग्नाबद्दल बोलत होता रितेश देशमुख; मागून बायको आली अन्…, पाहा नेमकं काय घडलं