Loksatta
शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
सुषमा अंधारेंनी शिरसाटांवर स्त्री मनाला लज्जा आणणारी भाषा वापरल्याचा गंभीर आरोप केला.
दुसरीकडे संजय शिरसाट यांनी आरोप फेटाळत पोलिसांनी त्यांना क्लीनचिट दिल्याचा दावा केला.
यानंतर सुषमा अंधारे पुन्हा आक्रमक झाल्या. त्यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत हल्ला चढवला.
या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आणि संजय शिरसाट यांच्या वादाचं प्रकरण नेमकं काय? याचा हा आढावा.
छत्रपती संभाजीनगर येथे आमदार संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात सुषमा अंधारे यांच्यावर सडकून टीका केली होती.
या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी परळी पोलीस ठाण्यात शिरसाटांविरोधात तक्रार दाखल केली.
परंतु, हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधील असल्याने येथील पोलीस ठाण्यात तक्रार वर्ग करण्यात आली.
विनयभंग, बदनामी आणि अब्रू नुकसानीचा दावा सुषमा अंधारे यांनी या तक्रारीतून केला होता.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना संजय शिरसाट म्हणाले होते, “ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहीत.”
सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्या याच वक्तव्यावर आक्षेप घेत तक्रार केली. मात्र, त्या तक्रारीवर गुन्हा दाखल झाला नाही.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेतल्याने सुषमा अंधारेंनी न्यायालयात धाव घेतली.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचं जाहीर केलं.
आता याच एसआयटीने या प्रकरणात आपल्याला क्लीनचिट दिल्याचा दावा संजय शिरसाटांनी केला.
शिरसाटांच्या याच क्लीनचिट दाव्यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने असभ्य आणि सवंग भाषेचा वापर केला – सुषमा अंधारे
ती भाषा स्त्री मनाला लज्जा आणणारी होती. त्या भाषेचे अनेक व्हिडीओ सार्वजनिक आहेत – सुषमा अंधारे
एकीकडे शितल म्हात्रे प्रकरणात ओरिजनल व्हिडीओ दाखवता येत नाही तरीही गुन्हे दाखल केले जातात – सुषमा अंधारे
दुसरीकडे आम्ही ओरिजनल व्हिडीओ दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत – सुषमा अंधारे
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्या खात्याकडूनच चौकशी समिती नेमली गेली. त्यामुळे त्यांना त्याविषयी जास्त माहिती असेल – सुषमा अंधारे
संभाजीनगरच्या बोलण्यात अतिशय असभ्य आणि उर्मट आमदाराने पोलिसांनी त्याला क्लीनचिट दिल्याचा दावा केला – सुषमा अंधारे
ही क्लीनचिट कशी दिली ते मला कळेल का? वकील म्हणून देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतील का? – सुषमा अंधारे
“एखाद्या प्रकरणात एसआयटी नेमली असेल, एखाद्या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असेल, तर पोलीस अधिकारी एकांगी चौकशी करतात का? – सुषमा अंधारे
या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार दोघांचंही म्हणणं ऐकावं लागेल – सुषमा अंधारे
कोणत्या अधिकाऱ्याला नेमलं, नेमलेला अधिकारी महिला होती की पुरुष हेच मला माहिती नाही – सुषमा अंधारे
त्या अधिकाऱ्यांचा प्रशासकीय वर्ग काय होता हेही मला माहिती नाही. ते माहिती करून घेण्याचा अधिकार मला आहे की नाही हे मला वकील फडणवीसांना सांगावं – सुषमा अंधारे