Premium

नवाब मलिकांना झिडकारल्यावर प्रफुल्ल पटेलांवरून भाजपपुढे ‘धर्म’संकट !

पटेल यांचे भाजप पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असून त्यांना दूर करणे, फडणवीस यांना शक्य नाही. त्यामुळे पटेल यांच्याबाबत कोणती जाहीर भूमिका घ्यायची, असा पेच फडणवीस आणि प्रदेश नेत्यांपुढे आहे.

marathi news, devendra fadnavis, bjp, praful patel, iqbal mirchi, bjp, ncp
नवाब मलिकांना झिडकारल्यावर प्रफुल्ल पटेलांवरून भाजपपुढे ‘धर्म’संकट !

उमाकांत देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचे कुख्यात दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणावरून झिडकारल्यानंतर दाऊदचाच सहकारी इक्बाल मिर्चीशी जमीनव्यवहार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत काय भूमिका घ्यायची, असे धर्मसंकट भाजपपुढे उभे राहिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहीलेले पत्र थेट प्रसिद्धीमाध्यमांपुढे उघड करून पंचाईत केल्याने हा वाद भाजप पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे.

वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मिळालेल्या मलिक यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी नागपूर येथे हजेरी लावली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाबरोबर सत्ताधारी बाकांवर बसले. देशद्रोहाचे आरोप केलेल्या मलिकांच्या मांडीला मांडी लावून भाजप नेते कसे बसले, या मुद्द्यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुऴे अस्वस्थ झालेल्या फडणवीस यांनी आधी देश, सत्ता नंतर, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना करून पवार यांना पत्रच लिहीले आणि महायुतीपासून मलिकांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला. हे पत्र फडणवीस यांनीच प्रसिद्धी माध्यमांकडे जाहीर केल्याने पवार नाराज झाले आहेत आणि ही बाब भाजप पक्षश्रेष्ठींच्या कानी घालण्यात आली आहे.

हेही वाचा… फाईलींच्या प्रवासानंतर पत्रप्रपंच; अजित पवार यांची कोंडी सुरूच

आता मलिकांबरोबरच प्रफुल्ल पटेल यांच्या इक्बाल मिर्चीबरोबरच्या संबंधांबाबतचा मुद्दा काँग्रेस व अन्य विरोधकांनी उपस्थित केल्याने फडणवीस व भाजपची कोंडी झाली आहे. पटेल यांचे दाऊदचा सहकारी मिर्चीशी संबंध असून वरळीतील सीजे हाऊस या मालमत्तेच्या विकासावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) २१ जुलै २०२२ रोजी कारवाई करून अनेक मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमतेच्या व्यवहाराच्या बदल्यात पटेल यांनी मिर्चीच्या निकटवर्तीय व नातेवाईकांना २२ कोटी रुपये, सात सदनिका दिल्याचा आरोप आहे. ईडीने पटेल यांच्या सदनिका, एक चित्रपटगृह, हॉटेल, पाचगणी येथे एक हॉटेल, दोन बंगले आणि साडेतीन एकर जमीन एवढ्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

हेही वाचा… आक्रमक भाजपला उत्तर देण्याची शिंदे सेनेची रणनिती

पटेल यांचे मिर्चीशी असलेल्या संबंधांवरून फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईनंतर आणि आधीही अनेकदा आरोप केले आहेत. मलिक यांच्यावर देशद्रोही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप फडणवीस यांनी केले, तेव्हाही पटेल व मिर्ची आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पटेल यांच्याविरोधात मोर्चा काढून निदर्शनेही केली होती.

हेही वाचा… राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या कामाने कोल्हापूरातील नेत्यांमध्ये वादाच्या भिंती

मात्र अजित पवारांबरोबर खासदार पटेल भाजपबरोबर आल्यावर फडणवीस यांनी आपली भूमिका बदलली. फडणवीस हे गोंदिया येथे ९ फेब्रुवारी २३ रोजी एका कार्यक्रमात पटेल यांच्याबरोबर सहभागी झाले आणि त्यांनी पटेल यांचा उल्लेख ‘ जवळचे मित्र आणि भाऊ ‘ असा केला. पटेल यांच्यावर देशद्रोही मिर्चीशी संबंध असल्याने आगपाखड करणाऱ्या फडणवीस यांना पटेल हे सत्तेत सहभागी झाल्याने मित्र आणि भाऊ वाटायला लागल्याने भाजप नेतेही बुचकळ्यात पडले.

हेही वाचा… धनंजय-पंकजा मुंडे एकत्र येतील, पण कसे ‌?

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने शिंदे-पवार गटातील भ्रष्टाचार, सार्वजनिक मालमत्तेची हानी, गुन्हेगारी जगताशी संबंध व अनेक आरोप असलेल्यांना आपल्याबरोबर घेतले आहे. खुद्द अजित पवारांविरोधात ७८ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस आदी सर्वच नेत्यांनी केले होते. त्यामुळे मुंबई बाँबस्फोट व अन्य देशविघातक कारवायांमध्ये आरोपी असलेल्या मिर्चीबरोबर संबंधांचे आरोप असलेल्या पटेल यांनाही भाजपने आनंदाने स्वीकारले. पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचे बिरसी विमानतळावर ५ नोव्हेंबर २३ रोजी एका कार्यक्रमासाठी स्वागतही केले होते.

हेही वाचा… खासदार शिंदे गटाचा, तयारी भाजपाची; पालघर लोकसभेत भाजपाची कुरघोडी?

मात्र देशद्रोहींशी संबंध असल्याचे आरोप असलेल्या मलिकांबरोबर मांडीला मांडी लावून बसल्याची टीका फडणवीस यांना झोंबली आणि त्यांनी लगेच मलिकांना झिडकारण्याच्या सूचना पवार यांना जाहीरपणे दिल्या. मग आता त्याच न्यायाने भाजपला पटेल कसे चालतात, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत व अन्य विरोधकांनी उपस्थित केल्याने भाजपची चांगलीच पंचाईत झाली आहे. पटेल यांचे भाजप पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असून त्यांना दूर करणे, फडणवीस यांना शक्य नाही. त्यामुळे पटेल यांच्याबाबत कोणती जाहीर भूमिका घ्यायची, असा पेच फडणवीस आणि प्रदेश नेत्यांपुढे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After nawab malik dilemma of devendra fadnavis and bjp over praful patel print politics news asj

First published on: 08-12-2023 at 12:34 IST
Next Story
राजकीय संघर्षातून करमाळ्याच्या साखर कारखान्याचे भवितव्य टांगणीला