Samajwadi Party Leader Akhilesh Yadav जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोक दल (आरएलडी)ने लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली आहे. आरएलडीने अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पार्टी (सपा) बरोबरची युती तोडली आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पार्टी (एएसपी) देखील उत्तर प्रदेशात एकट्याने लढण्याच्या तयारीत आहेत. ३७ वर्षीय चंद्रशेखर यांचा पश्चिम उत्तर प्रदेशातील दलित समाजावर मोठा प्रभाव आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला झुंज देण्यासाठी सपा, आरएलडी आणि एएसपी एकजुटीने तयारी करत असल्याची चर्चा होती.

“आम्ही यूपीमध्ये स्वबळावर १४ जागा लढवण्याचा विचार करत आहोत. युतीबाबत आम्ही सपाकडून अद्याप काहीही आलेले नाही आणि म्हणूनच आम्ही संघटनात्मकदृष्ट्या मजबूत असलेल्या प्रदेशांमध्ये एकट्याने लढण्याची तयारी करत आहोत,” असे चंद्रशेखर यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले. जस जश्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहे, संतसं इंडिया आघाडीतून पक्ष बाहेर पडत आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये सपा, आरएलडी आणि एएसपी यांनी उत्तर प्रदेशमधील खतौली आणि रामपूर विधानसभा पोटनिवडणूक एकत्र लढवली होती. खतौली विधानसभा मतदारसंघात याचा सकारात्मक परिणाम झाला होता. मतदारसंघातील मोठ्या प्रमाणात दलित मते विजयी आरएलडी उमेदवाराच्या बाजूने गेली; ज्याचे श्रेय एएसपीला देण्यात आले होते.

आरएलडीने युती तोडली

भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए ला पराभूत करण्यासाठी आरएलडीने इंडिया आघडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे संगितले जात आहे. सपा आणि इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेस यांच्या संबंधात तणाव पाहायला मिळत असून याचा परिणाम जागा वाटपावर होत आहे. यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सपा आणि एएसपी यांच्यात अद्याप कोणतीही युतीची चर्चा झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, पश्चिम उत्तर प्रदेशातील नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या एएसपीचा निर्णय सपाला मान्य नाही. चंद्रशेखर यांना स्वत: या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा असून त्यांनी या मतदारसंघात प्रचारालाही सुरुवात केली आहे.

दलित आणि मुस्लीमबहुल नगीना मतदारसंघ मतदारसंघ हा कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला नाही. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा सपा, २०१४ मध्ये भाजपा आणि २०१९ मध्ये बसपाने जिंकली होती. १९८९ मध्ये, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी स्वतः बिजनौर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. सपाने यादव, मुस्लिम आणि दलित मते एकत्रित करण्यासाठी २०१९ची लोकसभा निवडणूक बसपासोबत युती करून लढवली होती. परंतु, या युतीचा सपाला फारसा फायदा झाला नाही. या निवडणुकीत सपाने पाच आणि बसपाने १० जागा जिंकल्या. “राज्याच्या अनेक भागात आमचा प्रभाव आहे, परंतु आम्ही या जागांसाठी आमचे उमेदवार निश्चित करत नव्हतो कारण युतीनंतर आम्हाला खूप कमी जागा लढवाव्या लागतील असा अंदाज होता. पण आता निवडणुकांना फक्त दीड महिना उरला आहे. आम्ही आता निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत, ”एएसपी नेत्याने सांगितले.

उत्तर प्रदेशातील १४ जागांवर एएसपी निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. यात सिद्धार्थ नगर, लखनौ, अमरोहा, मेरठ, सहारनपूर, नगीना, मुझफ्फरनगर, लालगंज, आझमगढ, आंबेडकर नगर आणि अयोध्या या मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची तयारी सुरू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्या प्रमुख नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त चंद्रशेखर यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, दिल्ली, झारखंड आणि हरियाणामध्ये उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहे. “जिथे आमचा पक्ष मजबूत आहे, अशा राज्यांमध्ये आम्ही निवडणूक लढवत आहोत. नवीन पक्ष असल्याने आम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. आम्हाला इलेक्टोरल बाँड्स किंवा कॉर्पोरेट्सकडून पैसे मिळत नाहीत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांकडूनच निधी दिला जातो,” असे चंद्रशेखर म्हणाले.

हेही वाचा : अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला पक्षांतर्गतच विरोध; ‘हे’ सूत्र समाजवादी पक्षासाठी किती फायद्याचे?

हरियाणात एएसपी अंबाला, सिरसा आणि फरीदाबादमध्ये; राजस्थान मधून अलवर आणि भरतपूर; मध्य प्रदेश मधून ग्वाल्हेर आणि मुरैना; बिहार मधून हाजीपूर आणि सासाराममध्ये; झारखंड मधून पलामू आणि जमशेदपूरमध्ये; आणि दिल्ली मधून दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे.