अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने मराठा कार्डची खेळी खेळल्यामुळे निवडणुकीतील चूरस वाढली आहे. भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे डॉ. अभय पाटील रिंगणात असल्याने परंपरेनुसार मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. प्रमुख दोन उमेदवार मराठा समाजाचे असल्याने हिंदू मतांचे ध्रुवीकरण होईल. तिरंगी लढतीतील मतविभाजन यावेळेस कुणाच्या पथ्यावर पडणार, यावरून राजकीय आडाखे बांधले जात आहेत. तिरंगी लढत नेहमी भाजपच्या पथ्थ्यावर पडते. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होणार का, याचीही चर्चा सुरू झाली.

अकोला मतदारसंघात जातीय राजकारण व मतविभाजनाचे गणित प्रत्येक लोकसभा निवडणुकीत प्रभावी ठरते. गत साडेतीन दशकांमध्ये दोन निवडणुकांचा अपवाद वगळता अकोल्यात तिरंगी लढतच झाली. या तिरंगी लढतीचा नेहमीच भाजपला लाभ झाल्याचा इतिहास आहे. १९८९ पर्यंत अकोला मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतरच्या कालखंडात भाजपचे पांडुरंग फुंडकर यांनी तीनवेळा, ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर दोनदा, तर माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सलग चारवेळा प्रतिनिधित्व केले. भाजपचा गड म्हणून अकोल्याची ओळख आहे. गत साडेतीन दशकात काँग्रेसला येथील पराभवाची मालिका खंडित करता आलेली नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने अल्पसंख्याक उमेदवार दिल्यामुळे अकोल्यात दलित, मुस्लीम व हिंदू अशी तिरंगी लढत झाली होती. त्याचा एकतर्फी फायदा भाजपला झाला. आताही तिरंगी लढत असली तरी रणनीतीमध्ये मोठा बदल पाहायला मिळण्याचा अंदाज आहे.

wardha lok sabha seat, devendra fadnavis, not attend, campaign rally , discussion started, bjp, less crowd, sharad pawar, rally, marathi news, maharashtra politics,
शरद पवारांच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या फसलेल्या रॅलीची गावभर चर्चा; मात्र, भाजपा नेते म्हणतात…
Hatkanangale Lok Sabha
धैर्यशील माने – राजू शेट्टी दोघांचाही बदलता राजकीय प्रवास
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

हेही वाचा – भाजपा मंत्र्याच्या मुलाची जोडप्याला मारहाण; मध्य प्रदेशमध्ये पक्ष का आलाय अडचणीत?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात काँग्रेसच्या दोन व राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे अकोल्यात त्यांच्या विरोधात ‘मविआ’ उमेदवार देणार का? यावरून तर्कवितर्क लावले जात होते. काँग्रेसने त्याचा विचार न करता अकोल्यात मराठा ‘कार्ड’ खेळले आहे. डॉ. अभय पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून निवडणुकीची मोर्चेबांधणी केली. अकोला मतदारसंघात मराठा मतदारांचे प्राबल्य आहे. या मतांवर प्रमुख तिन्ही उमेदवारांनी दावा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होणे अटळ समजले जात आहे.

अकोल्यात दलित, मुस्लीम, ओबीसी, माळी, धनगर, आदिवासी आदी मतदारांची संख्या देखील मोठी आहे. या समाजाची गठ्ठा मते देखील निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. २०१९ च्या निवडणुकीत जातीऐवजी धार्मिक रंग चढले होते. यावेळेस जातीय राजकारण वरचढ होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या प्रयोगामुळे यावेळेस मतदारसंघातील निवडणुकीत रंगत आली आहे. तिन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढतीचे संकेत असून बदललेले समीकरण कुणासाठी पोषक ठरेल, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

हेही वाचा – घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी

अकोल्यात काँग्रेसचे प्रयोग

अकोल्यात काँग्रेसकडून नेहमीच प्रयोग करण्यात येतो. काँग्रेसने गेल्या चार निवडणुकांमध्ये माळी, मराठा व दोन वेळा मुस्लीम उमेदवार दिले. मात्र, त्यांना विजय मिळवता आलेला नाही. आता काँग्रेसने दीड दशकानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला प्रतिनिधित्व दिले. या अगोदर २००९ मध्ये मराठा समाजाचे बाबासाहेब धाबेकर अकोल्यात काँग्रेसकडून लोकसभेच्या रिंगणात होते. त्यावेळी काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. आता इतिहासाची पुनरावृत्ती होते की बदल घडून येतो, याकडे लक्ष राहणार आहे.