अलिबाग- रायगड लोकसभा निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे दिवंगत नेते बॅरीस्टर ए. आर. अंतुले असल्याचे दिसून येत आहे. महायुती आणि इंडीया आघाडी दोन्हींच्या सभामध्ये अंतुलेच्या नावाचा वापर केला जात आहे. अंतुले यांच्या नावाचे वलय निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्याच्या वाटचालीत बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांचे मोठं योगदान आहे. १९८९, १९९१, १९९६ २००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अंतुले यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणावर त्यांच्या प्रभाव कायम राहिलाच राहिला आहे. त्यांच्या पश्चात होणारी ही लोकसभेची दुसरी निवडणूक आहे. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी अंतुले कायम असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – TMC पेक्षा १ जागा जास्त जिंकलो तरी ममता सरकार पडेल; बंगाल भाजपा प्रमुखांचा दावा

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अंतुलेंचा मतदारसंघ म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने राष्ट्रवादीसाठी सोडला होता. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे अंतुले नाराज झाले होते. त्यांनी रायगड आणि मावळ दोन्ही मतदारसंघातील शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला होता. मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याच्या निर्णयावर टीका केली होती. तटकरेंवर निशाणा साधला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बॅरीस्टर अंतुले या नावाचा करिष्मा कायम होता. निवडणुकीच्या तोंडावर अंतुलेंचे चिरंजीव नाविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. अंतुलेंचा हात धरून तटकरेंनी राजकारणात प्रवेश केला होता.

गेल्या आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीतही बॅरीस्टर अंतुले पुन्हा एकदा प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याचे पहायला मिळत आहे. महायुती आणि इंडीया आघाडी दोन्हीच्या सभामध्ये बॅरीस्टर अंतुले यांचे नाव आणि फोटोचा वापर केला जात आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अंतुलेंचे राजकीय वारसदार असलेले माजी आमदार मुश्ताक अंतुले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माणगाव तालुक्यातील एकाच दिवशी झालेल्या मोर्बा येथे झालेल्या इंडिया आघाडी आणि महायुतीच्या प्रचार सभेत याचाच प्रत्यय आला आहे. मुस्लिम मतांचे दान आपल्या उमेदवारांच्या पारड्यात पाडण्यासाठी बॅरीस्टर अंतुलेच्या नावाचा वापर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – मुस्लीम ते ख्रिश्चन, एझावा ते दलित; केरळमध्ये जातीय समीकरणावर ठरणार निकालाचे गणित

एकूणच बॅरीस्टर अंतुले आज हयात नाहीत. पण रायगडच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव तसूभरही कमी झाला नाही. सत्ताधारी असो वा विरोधक अंतुलेंचे नाव प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेऊन आपली राजकीय वाटचाल करीत असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antule influence in campaign of raigad continues even today print politics news ssb