लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने बिहारमधील लोकसभेच्या ४० जागांसाठी तिकीट वाटपाची घोषणा केली होती. चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) पाच तिकिटे मिळाली. चिराग यांचे काका पशुपती कुमार पारस यांच्या पक्षाला एकही तिकीट मिळाले नाही; ज्यानंतर नाराज पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दोन वेळा खासदार राहिलेले चिराग पासवान हे त्यांचे वडील रामविलास पासवान यांच्या हाजीपूर या पारंपरिक जागेवरून निवडणूक लढवणार आहेत.

‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत चिराग यांनी २०२० मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यापासून सुरू असलेला संघर्ष, काका पशुपती कुमार पारस आणि त्यांच्यातील मतभेद, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबरचे त्यांचे समीकरण अशा अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

आम्हीच मूळ लोक जनशक्ती पक्ष

लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) ला एनडीएमध्ये मूळ लोक जनशक्ती पक्ष म्हणून स्थान मिळाले आहे. तुमच्या वडिलांच्या निधनानंतरच्या प्रवासाबद्दल काय म्हणणे आहे? असा प्रश्न केला असता, चिराग यांनी सांगितले की, माझे वडील गेल्यापासून हा प्रवास खूप खडतर राहिला आहे. माझे कुटुंब आणि पक्ष विभागले गेले. माझ्याच लोकांनी मला वेठीस धरले. मला अनेकदा ‘स्टार-किड’ राजकारणी म्हटले जायचे. पण संघर्षाने मला एक चांगला माणूस आणि नेता केले.

आता भाजपाने आम्हाला मूळ लोक जनशक्ती पक्ष म्हणून स्वीकारले आहे. आम्ही प्रतिष्ठित जागा असलेल्या हाजीपूरसह (सध्या पारस प्रतिनिधित्व करत असलेल्या) पाच जागा लढवणार आहोत. काही टक्के लढाई आम्ही जिंकलो आहोत. पण आम्ही मुख्य लढाईसाठी तयार आहोत, असे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले.

वडिलांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी

तुमच्या वडिलांनी नऊ वेळा प्रतिनिधित्व केलेल्या हाजीपूर या जागेवरून निवडणूक लढविण्याबाबत तुमचे विचार काय आहेत? यावर चिराग म्हणाले की. मी आनंदी आहे, भावनिक आहे आणि थोडा अस्वस्थ सुद्धा आहे. कारण- ही जागा माझ्या वडिलांची राहिली आहे. ते पुढे म्हणाले की, हाजीपूरमधून निवडणूक लढवण्याची संधी म्हणजे मला माझ्या वडिलांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला हाजीपूरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत.

काका पशुपती कुमार पारस हे पासवानांच्या लढाईत हरले आहेत असे वाटते का? कारण- पारस स्वतःला रामविलास पासवान यांचे मूळ वारसदार मानतात, यावर चिराग यांनी स्पष्ट केले की, पासवानांची लढाई जिंकण्याबद्दल आहे की नाही हे मला माहित नाही. मला खात्री नाही की, हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला आणि त्या विषयावर वाद कोणी सुरू केला. माझ्या वडिलांच्या राजकीय वारशाचे खरे वारसदार आहेत, असे माझे काका म्हणतात हे खरे आहे. पण वारसदाराच्या शर्यतीत मी कधीच नव्हतो.

प्रचारादरम्यान नितीश कुमार यांच्याबरोबर व्यासपीठावर एकत्र येणार का? या प्रश्नावर चिराग पासवान म्हणाले की, एकत्र काम करणे आणि बिहारमधील सर्व ४० जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही आमच्या वैयक्तिक मुद्द्यांमध्ये गुंतलो, तर ते युतीसाठी चांगले होणार नाही. माझ्या वडिलांप्रमाणे मीदेखील इतर मुद्द्यांपेक्षा देशाला प्राधान्य देण्यावर विश्वास ठेवतो. युती, पक्ष आणि व्यक्ती नंतर येतात. मला निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावर एकत्र येण्यात काहीच हरकत नाही.

कोणाचीही जागा घेण्याचे ध्येय नाही

लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) भविष्यात जेडी(यू) ची जागा घेऊ शकेल का? यावर चिराग यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी मी हाजीपूरमधून निवडणूक लढवणार की नाही याचीही खात्री नव्हती. मी एनडीएचा भाग होईल की नाही याचीही मला खात्री नव्हती. कोणाचीही जागा घेण्याचे माझे ध्येय नाही. मला माझी स्वतःची जागा तयार करायची आहे.

तुमचे चुलत भाऊ आणि समस्तीपूरचे खासदार प्रिन्स राज त्यांच्या जागेबद्दल तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत का? यावर ते म्हणाले, प्रिन्स काय करत आहेत याची मला कल्पना नाही. त्यांनी माझ्याशी संपर्क साधला नाही. त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत मी कोणत्याही अंदाजावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

बिहारमधील डबल इंजिन सरकारने, तसेच नितीश कुमार यांनी गेल्या १८ वर्षात अनेक चांगली कामे केली आहेत. ‘बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा आमचा मुख्य अजेंडा आहे. त्यानुसार आम्ही काम करू. युवा शक्तीला प्राधान्य देण्यावर आणि बिहारला विकास निर्देशांकात अव्वल स्थानावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रात आमचे ऐकणारे सरकार असेल तर राज्यासाठी आमचा अजेंडा राबवणेदेखील सोईचे होईल, असा संदेश त्यांनी मतदारांना दिला.

इंडिया आघाडीबद्दल बोलतांना ते म्हणाले की, युती आहे की नाही हे मला माहीत नसल्याने त्याबाबत माझ्याकडे फारसे काही बोलण्यासारखे नाही. आघाडीला मार्गदर्शन करणारी व्यक्ती नितीशकुमार आमच्याकडे परत आले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची आघाडी कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी केला. औपचारिक जागावाटपाच्या आधी एका पक्षाने काही जागा पूर्वीच जाहीर केल्या. युतीमध्ये स्पष्टता नाही. इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष वैयक्तिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लढत आहेत, असे चिराग म्हणाले.

हेही वाचा: रामलीला मैदान- जयप्रकाश नारायण यांचे इंदिरा गांधींविरोधात आंदोलन ते आप पक्षाच्या स्थापनेचे केंद्र

मेहुणे अरुण भारती यांना जमुईची जागा देण्यावर चिराग म्हणाले की, जमुई या जागेवर मी दोनदा निवडून आलो आहे. ही जागा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मी अशा व्यक्तीच्या शोधात होतो जो माझ्याइतकी या जागेची काळजी घेऊ शकेल. मी असे म्हणत नाही की, कुटुंबाबाहेरील व्यक्तिला हे जमले नसते. परंतु, मला असे वाटते की, अरुण भारती या जागेसाठी योग्य आहेत. मला माहित आहे की, लोक माझ्यावर माझ्या कुटुंबाचा प्रचार केल्याचा आरोप करतील. पण, मी त्याचा विचार केलेला नाही.