ED takes action on Veena Vijayan सक्तवसुली संचालनालया (ईडी) च्या रडारवर आता केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची कन्या वीणा विजयन आहेत. बुधवारी (२७ मार्च) ईडीने वीणा विजयन यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. कोट्टायम जिल्हा पंचायतीचे सदस्य आणि नुकतेच भाजपामध्ये सामील झालेले ज्येष्ठ राजकारणी पी.सी. जॉर्ज यांचा मुलगा शोन जॉर्ज यांच्या तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात लवकरच वीणा विजयन यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

वीणा यांची माहिती तंत्रज्ञान कंपनी ‘एक्सालॉजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या चौकशीसाठी शोन जॉर्ज यांनी ईडीकडे धाव घेतली. २०२३ मध्ये प्राप्तिकर विभागाने केलेल्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या. कोची येथे असणार्‍या कोचीन मिनरल्स अँड रुटाइल लिमिटेड (सीएमआरएल) कंपनीने वीणा विजयन यांच्या एक्सालॉजिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडला २०१८-१९ पासून तीन वर्षांत १ कोटी ७२ लाख रुपयांचे बेकायदा पेमेंट केले. कंपनीला कोणतीही सेवा पुरविली नसताना हा व्यवहार झाल्याचे, तपासात आढळून आले होते. तेव्हापासून वीणा विजयन केंद्र सरकारमधील विविध यंत्रणांच्या रडारवर आहेत.

कोण आहेत वीणा विजयन?

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना केरळमधील राजकीय संभाषणांमध्ये वीणा यांचा अनेकदा उल्लेख झाला; ज्यामुळे त्यांचे नाव चर्चेत आले. २००० साली वीणा तामिळनाडूमधील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असल्याने विजयन यांच्या विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर एक्सालॉजिक कंपनीची स्थापना करण्यासाठी त्यांनी केरळ सोडून बंगळुरूची निवड केल्यामुळेदेखील त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

२०१२ मध्ये तिरुअनंतपुरम येथे अब्जाधीश रवी पिल्लई यांनी प्रमोट केलेल्या आरपी ग्रुप अंतर्गत सुरू करण्यात आलेला आयटी उपक्रम ‘आरपी टेकसॉफ्ट इंटरनॅशनल’मध्ये वीणा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सामील झाल्या. तेव्हापासूनच वीणा यांची आयटी क्षेत्रातील कारकीर्द चर्चेत आली. त्यापूर्वी वीणा यांनी ओरॅकल आयटी कंपनीबरोबर काही वर्षे काम केले. आरपी टेकसॉफ्टमधून पायउतार झाल्यानंतर वीणा यांनी स्वतःच्या कंपनीची स्थापना केली. त्यांनी एकट्याने एक्सालॉजिक ही कंपनी सुरू केली. २०१४ साली बंगळुरू येथे सुरू करण्यात आलेली एक्सालॉजिक सॉल्युशन्स ही स्टार्ट-अप कंपनी आता वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.

वादग्रस्त स्प्रिंकलर डीलच्या मास्टरमाइंड?

२०२० मध्ये, सोन्याच्या तस्करी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी स्वप्ना सुरेश यांनी वीणा यांच्यावर गंभीर आरोप केले. वीणा याच वादग्रस्त स्प्रिंकलर डीलमागील मास्टरमाइंड होत्या. त्यांनी अमेरिकेतील स्प्रिंकलर या कंपनीला कोविड क्वारंटाईन अंतर्गत केरळमधील लोकांच्या वैयक्तिक संमतीशिवाय त्यांच्या आरोग्यसंबंधी डेटाचे संकलन करण्याची परवानगी दिली होती, असे आरोप स्वप्ना सुरेश यांनी केले.

या आरोपांवर बोलतांना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने वीणा यांना सुरेश यांच्यावर सुरू असलेल्या केसशीदेखील जोडण्याचा प्रयत्न केला होता. जून २०२२ मध्ये राज्य विधानसभेत सोन्याच्या तस्करी प्रकरणावर चर्चा करताना, काँग्रेसने आरोप केला होता की, प्राइसवॉटरहाऊस कूपर्स (पीडब्ल्यूसी) चे संचालक जयक बालकुमार हे वीणाच्या आयटी फर्मचे मार्गदर्शक होते आणि पीडब्ल्यूसीने सुरेश यांना केरळ सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्पेस पार्क प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून कामावर ठेवले होते. जुलै २०२० मध्ये सोन्याच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर, एक्सालॉजिक कंपनीची वेबसाइट काही काळासाठी बंद होती.

सीएमआरएल आणि वीणा यांच्या एक्सालॉजिक कंपनीचा करार

प्राप्तीकर विभागाच्या २०२३ च्या अहवालानुसार, सीएमआरएल ने २०१७ मध्ये एक्सालॉजिक कंपनीबरोबर ३ लाख रुपयांच्या मासिक मानधनासह सॉफ्टवेअरच्या विकास आणि व्यवस्थापनासाठी करार केला होता. छाप्यादरम्यान जप्त केलेल्या आणखी एका कागदपत्राद्वारे असे स्पष्ट होते की, सीएमआरएल ने वीणा यांना २०१७ पासून ५ लाख रुपयांच्या मासिक मानधनावर आयटी आणि विपणन सल्लागार म्हणून नियुक्त केले होते.

त्यावर काँग्रेसने आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आणि आरोप केला की, या पेमेंटचा उल्लेख त्यांचे पती सीपीआय(एम) नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री मोहम्मद रियास यांच्या निवडणूक शपथपत्रात झाला नाही; जेव्हा २०२१ च्या निवडणुकीत ते बेपोर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

हेही वाचा : राहुल गांधींना आणखी एक धक्का; तीन टर्म खासदार राहिलेल्या ‘या’ नेत्याने धरली भाजपाची वाट

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या रियास यांच्या प्रतिज्ञापत्रात, वीणा यांचे २०१६-१७ मधील उत्पन्न ८,२५,७०८ रुपये होते. २०१७-१८ मध्ये उत्पन्न १०,४२,८६४ आणि २०२०-२१ मध्ये २९,९४,५२१ रुपये इतके वाढले आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत सल्लागार म्हणून दाखवण्यात आला आहे. वीणा यांच्या मालमत्तेचे बाजार मूल्य १,२८,८१२०० रुपये आहे. रियास यांच्याकडे २०१७-१८ ते २०२०-२१ पर्यंत उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. त्यांनी या कालावधीत आयटी रिटर्नही भरले नाहीत.