लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे, प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहे. परंतु, अजूनही नेत्यांचा भाजपा प्रवेश सुरूच आहे. “पंजाबमधील नवीन भाजपा, ही जुनी काँग्रेस आहे”, असे पंजाब भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी म्हटले. कारण तीन वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेले रवनीत सिंह बिट्टू यांनी भाजपात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू मंगळवारी (२६ मार्च) भाजपामध्ये सामील झाले. बिट्टू हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जायचे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भाजपा प्रवेशाने चित्रच बदलले

पक्षाचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये पक्षातून बाहेर पडल्यानंतर पंजाब काँग्रेसमधील नेते पक्ष सोडताना आणि इतर पक्षात सामील होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्यानंतर अमरिंदर यांनी पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी २०२२ मध्ये भाजपाबरोबर युती केली आणि निवडणूक लढवली. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. अमरिंदर यांनी मुलगी जय इंदर कौरसह भाजपामध्ये प्रवेश केला.

सध्या अमरिंदर सिंह भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत, तर जय इंदर पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि राज्य प्रचार समितीच्या सदस्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, अमरिंदर यांच्या पत्नी आणि पटियालाच्या खासदार प्रनीत कौर यांनीही भाजपाची वाट धरली. गेल्या वर्षी त्यांना काँग्रेसने निलंबित केले होते. भाजपाकडून यंदाच्या निवडणुकीत त्यांना त्यांच्याच जागेवरून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सुनील जाखड भाजपामध्ये सामील झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का

“काँग्रेसचेच नव्हे तर आम आदमी पार्टी (आप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) मधील आणखी बरेच नेते येत्या आठवड्यात भाजपामध्ये सामील होतील”, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. मे २०२२ मध्ये जेव्हा माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड भाजपामध्ये सामील झाले, तेव्हा काँग्रेसला मोठा धक्का बसला. ते आता पंजाब भाजपाचे प्रमुख आहेत. पक्षावर अनेक आरोप करत जाखड यांनी पक्ष सोडला होता. अमरिंदर यांच्या राजीनाम्यानंतर जाखड यांना मुख्यमंत्री न केल्याने पक्षात नाराजी असल्याचे सांगण्यात येत होते. कारण ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपद नाकारले होते आणि या पदासाठी शीख चेहऱ्याचा आग्रह धरला होता.

पंजाबमधील नवीन भाजपा, ही जुनी काँग्रेस

भाजपामध्ये गेल्यापासून जाखड स्वतःची टीम तयार करत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या प्रदेश भाजपा कार्यकारिणीत अनेक माजी काँग्रेस नेतेमंडळींचा समावेश आहे. “पॅनेलमधील अनेक शीख चेहरे काँग्रेसचे आहेत”, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. पंजाबसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही केले, त्यासाठी जाखड यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. “मोदींनी करतारपूर कॉरिडॉर उघडला, प्रत्येक धान्य शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाईल याची खात्री केली, गुरु गोविंद सिंह यांच्या शहीद पुत्रांच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस साजरा केला. त्यांना आणखी बरेच काही करायचे आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत”, असे त्यांनी सांगितले आणि राज्यात लोकसभा निवडणूक भाजपा एकट्याने लढवणार असल्याची घोषणाही केली.

पंजाबमधील अनेक काँग्रेस नेते भाजपात

डिसेंबर २०२१ मध्ये भाजपाने विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांचे बंधू माजी काँग्रेस आमदार फतेह जंग बाजवा यांचेही पक्षात स्वागत केले. फतेह यांनी २०२२ ची विधानसभा निवडणूक बटाला येथून भाजपाचे उमेदवार म्हणून लढवली, पण ते चौथ्या क्रमांकावर राहिले.

मोगाचे माजी काँग्रेस आमदार आणि पंजाब भाजपाचे सचिव हरजोत कमल सिंह यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर भाजपात सामील झाले. त्यांचा काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध होता आणि काँग्रेसमध्ये असताना ते अनेक पदांवर कार्यरत होते. २०२२ ची निवडणूक त्यांनी भाजपाच्या तिकिटावर मोगामधून लढवली आणि फतेह जंग बाजवा यांच्याप्रमाणेच चौथ्या क्रमांकावर राहिले.

राज्य भाजपाच्या कोअर कमिटीमध्ये माजी आमदार अरविंद खन्ना, केवल ढिल्लन, माजी मंत्री मनप्रीत सिंह बादल, राणा गुरमीत सिंह सोधी यांच्यासह अनेक माजी काँग्रेस नेते आहेत. खन्ना यांनी जानेवारी २०२२ मध्ये काँग्रेस सोडली आणि संगरूरमधून भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, तर धिल्लन यांनी जूनमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला आणि संगरूर संसदीय पोटनिवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली, जिथे ते चौथ्या स्थानावर राहिले.

हेही वाचा : महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भाजपाकडून राजमाता; कोण आहेत अमृता रॉय?

गेल्यावर्षी अनेक नेत्यांची घरवापसी

बादल यांनी जानेवारी २०२३ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. माजी आमदार बलबीर सिंह सिद्धू, राज कुमार वेरका, गुरप्रीत सिंह कांगार आणि सुंदर श्याम अरोरा यांसारख्या इतर काँग्रेस पक्षांनी जून २०२२ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. या सर्व नेत्यांना पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले होते. मात्र, अरोरा यांना सोडल्यास गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सर्व जण काँग्रेसमध्ये परतले.

भाजपामध्ये शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) माजी अध्यक्ष गुरचरण सिंह तोहरा यांचे नातू कंवरवीर सिंह तोहरा हे पक्षाच्या युवा शाखेचे राज्य प्रभारी आहेत. २०२२ मध्ये त्यांनी अमलोह विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.