खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममध्ये आहे. मात्र, आसाममध्ये या यात्रेला गालबोट लागले आहे. यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस कार्यकर्ते तसेच इतर सामान्य नागरिक आणि आसाम पोलिस आमनेसामने आल्यामुळे येथे तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षात आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह आणि काँग्रेसचे नेते जाकीर हुसैन सिकदर हे दोघे पोलिसांशी झालेल्या संघर्षात जखमी झाले आहेत.

यात्रा उधळून लावण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला गुवाहाटीमध्ये प्रवेश देऊ नका, असा आदेश यंत्रणांना दिला आहे. या यात्रेने शहरात प्रवेश केल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, वाहतुकीची समस्या निर्माण होईल, असे मत सर्मा यांचे आहे. या निर्णयानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेसची यात्रा उधळून लावण्यासाठी आसाम सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. या यात्रेला शहरात प्रवेश देण्यास बंदी असली, तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमध्ये प्रेवश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी रोखले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आसाम पोलिस यांच्यात काही काळासाठी संघर्ष निर्माण झाला. यात भूपेन सोराह आणि जाकीर सिकदर जखमी झाले.

गुवाहाटीकडे जाण्याचा रस्ता केला बंद

मंगळवारी (२३ जानेवारी) सकाळी भारत जोडो न्याय यात्रा मेघालयातून गुवाहाटीकडे निघाली होती. मात्र, मध्येच खानापारा परिसरात पोलिसांनी बॅरिकेड लावून गुवाहाटीकडे जाण्याचा रस्ता बंद केल्याचे या यात्रेकरूंना आढळले. यावर काँग्रेसचे कार्यकर्ते नवीन कुमार पासवान यांनी प्रतिक्रिया दिली. “पोलिसांनी आमच्यावर लाठीमार केला, मीदेखील यात जखमी झालो. माझ्या पायाला आणि हाताला जखम झाली आहे”, असे पासवान यांनी सांगितले.

“बेशिस्त वर्तनामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन”

दरम्यान, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यानंतर सर्मा यांनी राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. “ही आसामची संस्कृती नाही, अशा प्रकारचे नक्षली डावपेच आमच्या प्रदेशात नाहीत, त्यामुळे मी आसामच्या डीजीपींना राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. गर्दीला भडकावण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करावा, असे मी त्यांना सांगितले आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनी जे व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहेत, त्याचा पुरावा म्हणून वापर करावा. राहुल गांधी यांच्या बेशिस्त वर्तनामुळे मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे, यामुळे गुवाहाटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे”, असे हिमंता बिस्वा सर्मा म्हणाले.

यात्रेतील गाड्यांवर हल्ला

पोलिस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यातील संघर्षात बोराह जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान भाजपाचे झेंडे हातात घेऊन काही लोकांनी यात्रेतील वाहनांवर हल्ला केला. ही घटना आसाममधील सोनितपूर येथे घडली होती. यावेळीही बोराह जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा बोराह जखमी झाले आहेत.

पोलिसांनी लावले बॅरिकेड्स

या घटनेनंतर आसाम प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मीरा बोरठाकूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला प्रतिक्रिया दिली. भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते सकाळी खानापारा येथे एकत्र जमले होते. आम्ही सकाळी ७.३० वाजता गुवाहाटीमध्ये प्रवेश करणार होतो, मात्र पोलिसांनी सर्वत्र बॅरिकेड्स लावलेले होते. तेथील प्रशासनाने वाहतूक रोखली होती, ज्यामुळे रुग्णवाहिका आणि विमानतळाकडे जाणारे प्रवासी मध्येच अडकले. राहुल गांधी यांना दोष देता यावा म्हणून असे करण्यात आले, असे मीरा म्हणाल्या.

राहुल गांधी यांचा केंद्र आणि राज्य सरकारवर आरोप

मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांना गुवाहाटीमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. पोलिस बंदोबस्त असल्यामुळे महामार्गावरून कार्यकर्त्यांना हा प्रवास करता आला नाही. त्यामुळे ही यात्रा महामार्गाच्या कडेने सुरू राहिली. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार मला मेघालयातील खासगी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी बातचित करू दिली नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. या विद्यापीठ प्रशासनाला आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्रालयाकडून संदेश देण्यात आला आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress bharat jodo nyay yatra in assam congress supporters and police clash prd