प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : आगामी वर्षभरातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्सवांमधील गर्दीला आकर्षित करण्याचे प्रयत्न प्रमुख राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. अकोला शहरातील सर्वात मोठ्या कावड व पालखी महोत्सवामध्ये नेत्यांनी भेटीगाठी व स्वागताच्या माध्यमातून निवडणुकांची मोर्चेबांधणी केली. मतदारांना प्रभावित करण्यासाठी नेत्यांवर धार्मिक उत्सवाचे रंग चढले आहेत.

चातुर्मास हा सण व उत्सवांचा काळ. या चार महिन्यांमध्ये अनेक मोठे उत्सव सार्वजनिकरित्या साजरे केले जातात. मध्य भारतातील सर्वात मोठ्या कावड व पालखी महोत्सवाची ७९ वर्षांची प्राचीन परंपरा अकोला शहरात आहे. पूर्णा नदीच्या पाण्याने आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला जातो. शिवभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या महोत्सवात हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. दरवर्षीच पालख्या, कावड व शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते सरसावतात. यंदा आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय मशागतीचा काळ असल्याने जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रचंड चढाओढ दिसून आली. उत्सवातील गर्दी आपल्याकडे वळविण्यासाठी नेत्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेत.

आणखी वाचा-राहुल गांधी-प्रियांका गांधी यांच्यात आलबेल नसल्याचा दावा, नव्या रणनीतीचा भाजपाला फायदा होणार?

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिका, नगर पालिकांच्या रखडलेल्या निवडणुका देखील लागू शकतात. या निवडणुकांच्या वर्षासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली. नेत्यांसह इच्छूकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पक्षांचाही संघटनात्मक बांधणीवर भर आहे. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हे नेत्यांचे लक्ष्य असते. त्यातच आलेला सण व उत्सवांचा काळ जनसंपर्क वाढविण्यासाठी सुवर्ण संधी आहे. त्याचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी नेत्यांचे सर्वाेतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कावड व पालखी महोत्सवात त्याचे प्रतिबिंब दिसून आले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. ऐरवी देश व राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असणारे ॲड. प्रकाश आंबेडकर गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुद्धा अधिक सक्रिय झाले आहेत. शहर व जिल्ह्यातील प्रश्न, समस्या ते सातत्याने मांडत आहेत. यंदा ॲड. प्रकाश आंबेडकरांनी कावड महोत्सवात अत्यंत उत्सवाने सहभाग घेऊन मानाच्या सर्व पालख्यांचे पूजन करण्यासह शिवभक्तांचा सत्कार केला. सर्वांशी भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यावर त्यांचा भर होता. यावेळेस कावड महोत्सवासाठी वंचितचे पदाधिकारी देखील कामाला लागले होते. महोत्सवात ‘वंचित’ने भाजपच्या तोडीस तोड शक्तिप्रदर्शन केले. दरवर्षीप्रमाणे भाजपने देखील कावड महोत्सवासाठी जय्यत तयारी केली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात मार्गात १२ ठिकाणी शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले. शिवभक्तांच्या स्वागतासाठी पूजा मंडप व सर्वाधिक कमानी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिसून आल्या. काँग्रेसच्यावतीने शहर कोतवाली चौकात प्रदेश सरचिटणीस मदन भरगड यांनी पालख्यांचे स्वागत केले. याशिवाय शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, मनसे, प्रहार आदी पक्ष देखील शिवभक्तांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र महोत्सवात होते. आगामी काळातील पोळा, गणेशोत्सव, ईद, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणांमध्ये देखील जनसंपर्क वाढविण्यासाठी नियोजनासह नेते मंडळी सज्ज आहेत. निवडणुकांमध्ये याचा कितपत लाभ होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आणखी वाचा-‘इंडिया आघाडी सनातन धर्माच्या विरोधातच’, उदयनिधी यांच्यानंतर द्रमुकच्या मंत्र्यांवर भाजपाची टीका

बाहेर ‘जनसंवाद’; पक्षांतर्गत अबोला

निवडणुकीच्या काळात जनमानसात पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी जनसंवाद, लोकसंवाद सारख्या यात्रा काढून जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्वाकडून करण्यात येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्यांची संवाद यात्रा नुकतीच अकोल्यात येऊन गेली. वरिष्ठ नेत्यांसमोर एकत्र दिसणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये इतर वेळी मात्र अबोला कायम असतो. पक्षांतर्गत कुरघोडी, गटातटाचे राजकारण केले जाते. काँग्रेसमधील हा वाद तर अनेकवेळा चव्हाट्यावर आला. भाजपमध्ये सुद्धा हे शीतयुद्ध सुरूच असते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election marches in kavad and palkhi mahotsav in akola print politics news mrj
First published on: 13-09-2023 at 11:12 IST