हरियाणात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे भाजपा अडचणीत आली आहे. हरियाणात तीन अपक्ष आमदारांनी भाजपाचा पाठिंबा काढून घेऊन, काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसमधील विधिमंडळ पक्षनेते भूपिंदर सिंह हुड्डाच याचे सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, त्यांनी वैयक्तिक भेट घेत, चार अपक्ष आमदारांना भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास आणि काँग्रेसला पाठिंबा देण्यास सांगितले. परंतु, हुड्डा यांच्या नेतृत्वाखालील रोहतक पत्रकार परिषदेत फक्त तीन आमदार सहभागी झाले आणि त्यांनी आपली बाजू बदलली असल्याची घोषणा केली. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा यांना भाजपाच्या बाजूने असणारे आणखी आमदार त्यांच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता, ते म्हणाले, “सारी बाते आपको बताना जरूरी नहीं हैं (तुम्हाला सर्व काही सांगण्याची गरज नाही).”

भाजपाचे संख्याबळ

हुड्डा यांनी चार आमदारांना भाजपाचा पाठिंबा काढून घेण्यास सांगितले होते. मात्र, तीन आमदारच यासाठी तयार झाले. जर का, आणखी एका आमदाराने आपला पाठिंबा काढून घेतला असता, तर नायब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमतासाठी कमतरता भासली असती. सध्या भाजपाचे ४० आमदार, दोन अपक्ष व हरियाणा लोकहित पक्षाच्या एका आमदाराने पाठिंबा दिल्याने, सैनी सरकारचे संख्याबळ ४३ आहे. तसेच भाजपाने जननायक जनता पक्षाच्या (जेजेपी) आणखी चार आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

आणखी आमदार काँग्रेसच्या संपर्कात

सूत्रांनी सांगितले की, ही उलथापालथ इथपर्यंतच मर्यादित नव्हती. हुड्डा अजूनही इतर अपक्ष आमदार आणि जेजेपीच्या १० आमदारांच्या संपर्कात आहेत. या आमदारांची दुष्यंत चौटाला यांच्याशी असणारी निष्ठा संशयास्पद आहे. आता काँग्रेसबरोबर असलेल्या अपक्ष आमदारांपैकी सोंबीर सांगवान यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितले, “४ जूनपर्यंत थांबा. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच भाजपाचे अनेक आमदारही पक्ष बदलण्यास तयार होतील.” सैनी सरकार टिकले तरी विधानसभा निवडणुकीला पाच महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे आणि हुड्डा यांनी राज्यात वातावरणनिर्मिती सुरू केली आहे, असे एका नेत्याने सांगितले.

“अपक्ष आमदार विरोधी पक्षात तेव्हाच जातात जेव्हा त्यांना वाटते की, सरकार बदलणे आवश्यक आहे,” असे काँग्रेस नेते व सहा वेळा आमदार राहिलेले संपत सिंह म्हणाले. ज्या तीन अपक्ष आमदारांनी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांचा काँग्रेसच्या तिकिटासाठी विचार केला जाईल, असे काँग्रेस सूत्रांनी सांगितले. सांगवान म्हणाले, “काँग्रेसने तिकीट दिले, तर मी ते स्वीकारेन आणि लढेन.”

अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस मजबूत

काँग्रेस समर्थकांनी असेही निदर्शनास आणून दिले की, काँग्रेसचे सभागृहात ३० आमदार आहेत. अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांच्या जातीय मतदारांचा पाठिंबाही पक्षाला मिळेल. सांगवान हे जाट, धरमपाल गोंडर हे अनुसूचित जातीचे व रणधीर गोलेन हे रोर समाजाचे आहेत.

हेही वाचा : राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

हरियाणातील काँग्रेसचे आघाडीचे नेते म्हणून हुड्डा यांचे स्थान मजबूत होते. परंतु, जवळपास वर्षभरापासून कुमारी सेलजा, रणदीप सुरजेवाला व किरण चौधरी हे प्रतिस्पर्धी हुड्डा यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी बुधवारी विधान केले होते की, हुड्डा यांनी राज्य सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू केल्यास ते काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहेत. या विधानावर हुड्डा म्हणाले होते की, जेजेपी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांना सरकार पाडण्याची इच्छा असेल, तर त्यांनी आपल्या आमदारांना राज्यपालांसमोर आणावे. हुड्डा यांच्या समर्थकांनी सांगितले, “हुड्डा यांना भीती आहे की, विरोधकांची मते विभागण्यासाठी हा चौटाला यांचा गेम प्लॅन आहे. अशी परिस्थिती उदभवल्यास निवडणुकीपूर्वी काही महिने शिल्लक असताना सरकार स्थापन करण्यापेक्षा हुड्डा राष्ट्रपती राजवट आणावयास लावतील.”